“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २१ वा”
अभंगाचा भावार्थ :
*➡️ नामाचा उच्चार-संकीर्तन करण्यासाठी विशिष्ट काळवेळेचे बंधन नाही. नामाचे माहात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात.
*➡️ साधकाचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते, म्हणून जडजीवांना तारणारे एक हरिनामच आहे.
*➡️ खरोखरी पहाता सर्व साधनांचे सार जे हरिनाम त्या नामासाठीच ही जिव्हा देवाने दिली असून जो त्या जिव्हेचा उपयोग नामोच्चारासाठी करतो त्याच्या भाग्याचे वर्णन कोण करू शकेल?
*➡️ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आमच्या पूर्वजांनी सांग असा हरिपाठ उपलब्ध केला म्हणूनच आम्हांला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला.
🌻थोडक्यात स्पष्टीकरण :
नामाविना जी इतर साधने आहेत त्यांना काळवेळेचे बंधन आहे. उदाहरणार्थ संध्यावंदन, हे प्रातःकाळी, मध्यान्हकाळी व सायंकाळी अशा तीन वेळेसच केले पाहिजे, इतर वेळां संध्येला चालत नाहीत. त्याचप्रमाणे शुचि-अशुचिचे नियमही इतर सर्व साधनांना पाळावे लागतात व या नियमांचे उल्लंघन झाल्यास साधक ब्रह्म होण्याऐवजी ब्रह्मराक्षस मात्र अचूक व्हायचा!
✅ इतर साधनांचा उपयोग कशासाठी करायचा ?
मन स्थिर करण्यासाठी, परंतु मन स्थिर करण्यासाठी जे उपाय करतो तेच अपाय होऊ लागले तर आपण चुकीचा परमार्थ करतो हे समजले पाहिजे म्हणून संत सांगतात प्रथम उपाधी कमी कर, जेवढ्या उपाधी कमी कराल तेवढी मनाची शांती, स्थिरता वाढेल व जेवढ्या उपाधी वाढवाल तेवढी मनाची अस्थिरता वाढेल. म्हणून “शहाणी माणसे उपाधी कमी करतात तर मूर्ख उपाधी वाढवितात”.
म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात-
मंत्र तंत्र काही करिसी जडी बुट्टी।
तेणें भूत सृष्टि पावशील।।
अशौचिया बाधा आणिका अक्षरां।
नाम निदसुरा घेतां तरे।।
परंतु काळवेळेचे बंधन किंवा शुचि-अशुचिचे नियम नामाला नाहीत, कुठल्याही परिस्थितीत नाम घेण्यास आडकाठी नाही. *असाल तेथे नामाचे चिंतन।* *याहुनी साधन आणिक नाही।।*
किंवा
काळवेळ नसे नामसंकीर्तनी।
उंचनीच योनी हेही नसे।।
धरा नाम कंठी सदासर्वकाळ।
मग तो गोपाळ सांभाळील।।
एकनाथ महाराज भावार्थ रामायणात हेच सांगतात-
नामासी नाही स्नान बंधन।
नाहीं नामापाशी विधि विधान।।
अबद्ध नाम अति पावन।
नाम परिपूर्ण परब्रह्म।।
इतकेच नव्हे तर इतर साधनाने जाणारा साधक फारच झाले तर स्वतःचा उद्धार करील परंतु नामाचे तसे नाही. नाम उच्चारणारा व नाम ऐकणारा दोन्हीं उद्धरून जातात. याचे कारण असे की, नाम व नामी यांत अभेद आहे.*नाम तेचि परब्रह्म। जपयज्ञ तो परम।।* *नामा म्हणे जनी ब्रह्म तेचि नाम।* *घेतां नेमधर्म सर्व काही।।*
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1066