
मावळ्यांच्या रक्तसिंचनातून स्वराज्याची निर्मिती!
जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प दुसरे
पिंपरी:
“मावळ्यांच्या रक्तसिंचनातून स्वराज्याची निर्मिती झाली. तो प्रेरणादायी इतिहास तरुणाईपर्यंत पोहचला पाहिजे!” असे विचार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराण्यातील डॉ. शीतल मालुसरे यांनी व्यक्त केले.
गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘नरवीर तानाजी मालुसरे यांचा अपरिचित इतिहास’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना डॉ. शीतल मालुसरे बोलत होत्या. प्राचार्या सारंगा भारती अध्यक्षस्थानी होत्या.
माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, डॉ. नीता मोहिते, शिल्पा वाघोले, सोनाली भोकरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. स्वर्गीय हनुमंत सखाराम भोकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे व्याख्यानपुष्प प्रायोजित करण्यात आले होते.
गीतल गोलांडे यांनी स्वागत केले. अश्विनी चिंचवडे यांनी शुभेच्छा दिल्या; तर प्राचार्या सारंगा भारती यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “महाराष्ट्राला देदीप्यमान इतिहास लाभला आहे. त्यामध्ये तानाजी मालुसरे यांचे स्थान असाधारण आहे!” असे मत व्यक्त केले.
डॉ. शीतल मालुसरे यांनी तानाजी मालुसरे यांचा जन्म, बालपण, बालशिवबांनी स्वराज स्थापनेची शपथ घेताना मावळ्यांमध्ये तानाजी – सूर्याजी या बंधूंचा असलेला समावेश हा तपशीलवार इतिहास कथन करून अफजलखान वध, शाहिस्तेखानाची छाटलेली बोटे अशा प्रत्येक महत्त्वाच्या मोहिमेत तानाजी मालुसरे यांचा कोणत्या प्रकारे सहभाग होता, ही साद्यंत माहिती दिली.
सावित्रीबाई यांच्याशी झालेला विवाह, उमा आणि रायबा ही अपत्ये हा तानाजींचा व्यक्तिगत जीवनपट सांगून कोंढाणा किल्ला सर करताना घोरपड या प्राण्याच्या नव्हे तर घोरपडे बंधूंच्या मदतीने चढाई करण्यात आली होती, असे प्रतिपादन करून तेथे तानाजींनी पत्करलेल्या हौतात्म्याचा प्रसंग अतिशय प्रत्ययकारी वर्णनाने त्यांनी श्रोत्यांसमोर साकार केला.
रायबा मालुसरे यांनी तहहयात आपल्या निष्ठा स्वराज्याप्रति वाहिल्या होत्या. तसेच शिवाजी महाराजांनी रायबांना जहागीर दिलेल्या पारगड किल्ल्यावर मालुसरे घराण्यातील आठ पिढ्यांनी वास्तव्य केले. महाराजांनी तानाजींचा निष्प्राण देह पाहून ‘गड आला पण माझा सिंह गेला!’ असे उद्गार काढून वाहिलेली आपल्या गळ्यातील समुद्र कवड्यांची माळ अजूनही मालुसरे घराण्याने जपून ठेवली आहे, असे नमूद करून, “खरा आणि योग्य इतिहास भावी पिढीला शिकवला पाहिजे!” असे प्रतिपादन केले.
गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. वैशाली खोले यांनी सूत्रसंचालन केले. हेमा सायकर यांनी आभार मानले.
- फॅशन फ्युजन फेस्टिवल सिझन
- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे
- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत ‘ पवना विद्या मंदीर प्रथम
- येळसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मणिषा ठाकर बिनविरोध
- जांभूळच्या ग्रामविकास अधिकारी कल्याणी लोखंडेंना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार



