व्यक्तिमत्व विकास– कसा साधायचा– एक चिंतन!– आपल्यातील नैसर्गिक शक्तीचा विकास!{ भाग क्रमांक एक}
मित्रांनो– कुठलंही कार्य करण्यासाठी माणसाच्या अंतकरणातून त्याच्यात असलेली ऊर्जा आणि क्षमता ही जागृत करणे- म्हणजेच त्या व्यक्तीला त्याची जाणीव करून त्याच्याकडून उत्तम असं कर्तुत्व करून घेणे! हाच त्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे!याबाबतीत अतिशय बोलकं उदाहरण म्हणजे एक सत्य घटना! मित्रांनो— आमच्या मारवाडी समाजाविषयी असं म्हटलं जातं की—“जहाँ न पोहोचे रेलगाडी- वहा पोहोचे मोटर गाडी!
जहाँ न पहुचे मोटर गाडी–
वहापहुचे बैलगाडी!
और जहां न पहुचे बैलगाडी–
वहापोहोचे मारवाडी!!
मित्रांनो– राजस्थानमध्ये सतत पावसाअभावी दुष्काळ पडत असल्यामुळे तेथील बहुतेक मारवाडी समाज आजूबाजूच्या राज्यात म्हणजेच– मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र येथे बऱ्याच वेळा स्थलांतरित झालेले आहेत! राजस्थान मधील
असाच एक परिवार पाणवठ्याच्या शोधात निघाला होता!
त्यात आठ महिन्यांच्या मुलापासून ,
80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत त्या परिवारातील सभासद मजल दर मजल करीत जिवाच्या आकांताने पायी चालत चालत निघाले होते!
ते दिवस मे महिन्याचे असल्यामुळे त्या राजस्थानच्या रखरखीत वाळवंटातील उन्हामुळे प्रत्येकाचा जीव कासावीस होत होता!त्यामुळे मारवाडी कुटुंबातील ऐंशी वर्षाचा म्हातारा इतका थकला की- तो बाकीच्या आपल्या परिवाराला अत्यंत केविलवाण्या स्वरात म्हणाला की,” मला माफ करा– मी आता एक पाऊल सुद्धा पुढे चालू शकत नाही! मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या! आपण पुढे चालत रहा, मला जर थोडी शक्ती मिळाली तर मी आपल्याला पुढे भेटेल ,अन्यथा माझ्या नशिबावर मला सोडून द्या !कृपया माझ्यासाठी वाट बघू नका! मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे!”–असं म्हणून तो मटकन खाली बसला!
बाकीच्यांनी त्याला पुढे चालण्यासाठी आग्रह धरला ,एवढंच नाही तर त्या आजोबांना आम्ही आमच्या पाठीवर पाळीपाळीने घेऊन जाऊ अशी विनंती केली ,कारण त्यांना माहीत होते की या कडकडीत उन्हात हे आजोबा जास्त वेळ तर तग धरू शकणार नाही आणि त्यांची प्राणज्योत काही तासातच संपेल!–
असहाय नजर टाकून ते आजोबा त्यांना म्हणाले की-,”- अरे बाबांनो ,तुमचं प्रत्येकाचं स्वतःचं ओझं इतकं झालं आहे की— मी या परिस्थितीत आपल्याला कोणालाही किंचितही त्रास देऊ इच्छित नाही ,कारण मी अत्यंत तृप्त समाधानी आयुष्य अनुभवलेल आहे आणि म्हणून माझ्या नशिबावर मला सोडून जा, कृपया पुन्हा आग्रह करू नका ,कारण मी माझ्या निर्णयावर ती ठाम आहे!–“
शेवटी अत्यंत दुःखी अंतकरणाने बाकीचे सभासद पुढील प्रवासाला निघाले!
आठ दहा पावलं पुढे गेल्यानंतर त्या कुटुंबातील एक सून कि जिच्या खांद्यावर ते आठ महिन्याचं तिचं स्वतःचं बाळ होतं– आपल्या मनाशी एक विचार केला आणि स्वतः एक ठाम निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्ष अमलातही आणला—म्हणजे आठ-दहा पावलं पुढे गेलेली ती सून परत आपल्या सासऱ्याच्या जवळ आली आणि त्यांच्या मांडीवर स्वतःचं आपलं ते बाळ ठेवून त्यांना उद्देशून ती म्हणाली-,”- मामंजी ,मघाशी आपण जे म्हणालात ते खरोखरच मला पटलेलं आहे!– माझं ओझं इतक झालेलं आहे की या मुलांचं ओझं घेऊन मी पुढे जाऊ शकत नाही!– म्हणून त्याला तुम्ही सांभाळा, तुमचं जे भविष्य, ते या माझ्या बाळाचं भविष्य ठरेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे!–” असं म्हणून ती पुढे निघाली पण शेवटी आईचं हृदय असल्यामुळे तिला मागे बघितल्याशिवाय पुढे जाववत नव्हतं! कारण म्हटलंच आहे की!– “घार हिंडते आकाशी ,चित्त तिचे बाळा पाशी—“
मित्रांनो– अशी तिची अवस्था झाली होती! त्यावेळी तिला एक चमत्कार दिसला की– काही क्षणापूर्वी आपला सासरा एक पाऊल सुद्धा पुढे न चालण्याची भाषा करणारा, ऐंशी वर्षाचा तो आजोबा विचार करतो आहे की!–माझं आयुष्य तर संपत आलेलं आहे–
पण या मुलाचं काय? त्याच्या भविष्याचं काय? त्याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे! त्याने पुन्हा आपला निर्णय बदलला! एवढेच नव्हे तर तो प्रत्यक्षात अमलातही आणला! —आपल्या लटपट कापणाऱ्या पायात असेल नसेल तेवढी शक्ती एकवटून त्या आजोबांनी- मांडीवर असलेल्या आपल्या त्या नातवाला थरथरणाऱ्या आपल्या हातांनी त्याला खांद्यावर घेतलं! आणि ते आजोबा एकेक पाऊल टाकत टाकत शेवटी त्या कुटुंबा बरोबरच पाणवठ्यावर पोहोचले!
यालाच म्हणतात कार्यप्रवृत्त करणे! म्हणजेच– ” मोटिवेशन!”
चला तर मित्रांनो आपण दुसऱ्या अंकात अशीच काही उदाहरणे पाहूया– की जी आपल्यात असलेल्या ऊर्जेची आपल्याला जाणीव करून देतात!
(शब्दांकन-ला.डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे )

error: Content is protected !!