तुझे आहे तुझ्यापाशी….परी तू  जागा विसरलासी…
मंडळी, कसे ते आपण आता पाहूया…
आपल्यातील अनेक व्यक्तींना त्यांच्यातील कला कौशल्य आणि कमतरता याची  सांगड बऱ्याच वेळा  घालता येत नाही. आपल्यात काहीतरी निश्चितपणे कौशल्य आहे.त्याऐवजी ते  आपल्यात असलेल्या  कमतरते बद्दलच सतत विचार करीत  असतात.

त्यामुळेच  त्यांच्याही नकळत त्यांच्यात एक न्यूनगंड निर्माण होतो.आपल्यातल्या  कमतरते पेक्षा आपल्यात वसत असलेल्या क्षमतेचा शोध आपण घेतला पाहिजे.त्याचा विकास करण्यावर आपण भर दिली पाहिजे.दुर्दैवाने बहुतेक जण आपल्यातील कमतरता शोधत असतात.

यापेक्षा आपल्यात असलेल्या क्षमतांची ओळख स्वतः करून तिची त्यांनी इतरांनाही ओळख करून द्यायला हवी.
मित्रांनो,  एक उदाहरण घेऊया.. एक साधा कंडक्टर..एकाच वेळी किती काम करतो.तो प्रत्येकाला हवं असलेलं तिकीट देतो.पैसे मोजून घेतो आणि तेवढेच मोजून आपल्याला परत करतो.

तिकीट घेणारा कोण …आणि तिकीट न घेणारा कोण..या सर्वांवर तो बारकाईने नजर ठेवून असतो. येणाऱ्या बस स्टॉप ची जाणीव सतत बसमधील प्रवाशांना करून देणारा आणि शेवटी बस अगदी वेळेत डेपोला सुरक्षित नेणारा! त्याचवेळी  पैशाचा चोख हिशोब देणारा कंडक्टर_- ही एक-अष्टावधानी व्यक्ती म्हणून आपल्यासमोर एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

मित्रांनो,  असंच एक दुसर उदाहरण घेऊया– एक किराणा दुकानदार- एकाच वेळी फोन घेतो.आपण विचारलेल्या मालाचा योग्य तो भाव सांगतो. त्याचवेळी दुकानाच्या गल्ल्यात पैसे मोजून ठेवतो. पत्नीने आणून दिलेला चहा घेतो. म्हणजे– एक साधा दुकानदार हा कदाचित अष्टपैलू नसेलही पण तो निश्चितच अष्टावधानी आहे.

हेच आपण प्रत्येक व्यवसायात रोज बघत असतो म्हणून मित्रांनो, कुठलाही व्यवसाय करताना स्वतःला कधीच कमी लेखू नये हाच खऱ्या अर्थाने स्वतःचा शोध स्वतःच घेणे आहे
  त्यामुळेच तो करीत असलेला व्यवसाय तो स्वाभिमानाने करणार आहे कारण- त्याला आता स्व ची ओळख झालेली आहे.कारण त्याला आत्ता स्वतःचा शोध लागलेला आहे.
 
   नदित पडल्यानंतर  कोणाचेच प्राण जात नाही पण– प्राण तेव्हाच जातात जेव्हा त्याला पोहता येत नाही. याचा अर्थ असा की– परिस्थिती कधीच समस्या नसते.पण मित्रांनो- समस्या केव्हा बनते?- जेव्हा आपल्याला परिस्थिती निश्चितपणे हाताळण्याची क्षमता आपल्यात असूनही आपण ती प्रत्यक्ष कृतीत आणित नाही, म्हणून पाण्यात पडल्यानंतर तरण किंवा मरण हे आपल्याच हाती असत याची जाणीव असणे गरजेचे आहे.
  
यासाठी स्व- ची ओळख होण हेच अत्यंत गरजेच आहे.हाच आपल्या चिंतनाचा आजचा विषय निश्चितपणे आपल्या पर्यंत पोहोचलेला आहे म्हणून मित्रांनो येथेच थांबतो धन्यवाद!
( शब्दांकन- ला.डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!