सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रक्रियेने नामस्मरणाचा अभ्यास केला असता स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वानंदाचे जागरण होते व तो स्वानंद वासनेचा खड्डा संपूर्ण भरून काढतो. इतकेच नव्हे तर तिच्या स्वरूपातच पूर्ण पालट घडवून आणतो. या वासनेचे म्हणजेच विषयासक्तीचे रूपांतर भगवद्भक्तीत होते.

             “ज्ञानेशांचा संदेश”
                     “सार्थ हरिपाठ”
                       “अभंग १४ वा”
                     
अभंगाचा भावार्थ :
➡️ जो हरीचे नामस्मरण सर्वकाळ, प्रेमाने व अगणित करील त्याच्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धैर्य खुद्द कलिकाळाला सुद्धा नाही.

➡️असे हे भगवन्नाम, वाचेने अखंड घेतले असतां नामधारकाला अनंत जन्माच्या तपाची पुण्याई प्राप्त होते व त्याच्या पूर्व आयुष्यात घडलेली अनंत पापे त्याच्या जीवनातून पळून जातात.

➡️शिवाने-शंकराने ज्या हरिनाम मंत्राचा जप केला त्या हरिनामाचा जो जप करील त्याला मोक्षाची प्राप्ती होईल.
➡️ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, नारायण नामाच्या पाठाने-जपाने साधकाला त्याच्या उत्तम अशा निजस्वरूपाचा साक्षात्कार होतो.

          थोडक्यात स्पष्टीकरण :

           नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी।
            कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी।।

हा अभंग नामसाधनेच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे. या अभंगात ज्ञानदेवांनी आपले हृदय मोकळे केले आहे. हरिनामस्मरण करण्याची ”मर्यादा” या अभंगात सांगितली आहे.* अमर्याद नामस्मरण हीच नामस्मरण करण्याची मर्यादा होय. *नामस्मरण नित्य म्हणजे सर्वकाळ झाले पाहिजे. त्याचप्रमाणे ते सत्य असले पाहिजे.

याचा अर्थ असा की, …. विषयप्राप्तीच्या इच्छेने, मुलगा होण्यासाठी, नोकरी मिळण्यासाठी, द्रव्यासाठी वगैरे जे नामस्मरण केले जाते, ते “सत्य” नामस्मरण या सदराखाली येत नाही.या नामस्मरणात विषय प्राप्ती हे ध्येय असते व देवाचे नामस्मरण हे त्याचे साधन असते, म्हणूनच हे नामस्मरण असत्य होय.

याचा अर्थ असा नाही की, … असे नामस्मरण करूच नये किंवा असे केलेले नामस्मरण फुकट जाते!
“नामस्मरण कसेही केले तरी ते फळते” असा नामशास्त्राचा महत्त्वाचा सिद्धांत आहे.

परंतु देवाच्या प्रीतीने केलेले नामस्मरण हे सत्य नामस्मरण होय. या नामस्मरणात देवाच्या प्रेमावाचून दुसरे काही मिळावे, अशी अपेक्षाच नसते. परंतु सत्य नामस्मरण तत्त्वतः कितीही श्रेष्ठ असले. तरी सर्वसाधारण मनुष्याच्या हातून सुरूवातीला घडणे शक्य नाही. कारण वासनेच्या संगाने मनुष्य जन्माला येतो व ही वासना विषयाला सन्मुख असते. या वासनेची शांती व्हावी, ती तृप्त व्हावी यासाठी जीव अनेक प्रकारची धडपड करतो.

हवेपणा म्हणजेच “वासना”.या वासनेचा खड्डा एवढा खोल आहे की, त्यात काहीही व कितीही टाकले-भरले तरी तो खड्डा भरून निघत नाही. कशाच तऱ्हेने या वासनेची तृप्ती होत नाही.नामस्मरण करणे ही त्या प्रकारची धडपड आहे.

परंतु इतर प्रकारची धडपड व नामस्मरण यांत फरक मात्र भू-वैकुंठाइतका आहे. पहिल्या प्रकारात विषयांचा मोह वाढत रहातो व अंतिम परिणाम तळमळ व तडफड यांत होतो. याच्या उलट विषय प्राप्तीच्या इच्छेने केलेले नामस्मरण हे सुरूवातीला जरी असत्य असले, तरी त्याची परिणती सत्य नामस्मरणात होते.

कारण नामस्मरणाने विषयेच्छा पूर्ण झाल्यावर विषयांची आसक्ती वाढण्याऐवजी ज्या भगवंताच्या कृपेने आपल्या इच्छा पूर्ण झाल्या त्या भगवंताची प्रीती अंत:करणात वाढू लागते. आता तो देवाचे नाम विषय प्राप्तीसाठी घेत नाही तर अंतःकरणात असलेली देवाची प्रीती भोगण्यासाठी घेतो. हे नामस्मरण सत्य होय! एकदा का सत्य नामस्मरणाला सुरूवात झालीकी, ते “अमित-अगणित” होऊ लागते.
(क्रमशः)
            — सद्गुरू श्री वामनराव पै*
                   *✍️ स. प्र. (sp)1048*

error: Content is protected !!