नोव्हेल मध्ये युवा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न
पिंपरी:
  लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी टू ची युथ कमिटी आणि NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने  *युवा सन्मान पुरस्कार सोहळा* आयोजित करण्यात आला होता. ह्या उपक्रमात 23 लायन्स क्लब्स सहभागी झाले.

या सोहळ्यात,  तरुण वयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १० युवक युवतींना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रांतपाल एम जे एफ लायन राजेश कोठावदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थिंना स्मृतिचिन्ह , प्रशस्तीपत्र आणि  ‘मन मे है विश्वास’ हे पुस्तक भेट देऊन  सन्मानीत करण्यात आले.  स्वतःच्या अपंगत्वावर जिद्दीने  मात करून कुबडीच्या साह्याने रायगड सर करणाऱ्या ओंकार लकडे या विद्यार्थ्याला विशेष लक्षवेधी सन्मान देण्यात आला. पूजा तानाजी बुधावले (योग आणि एकतेच्या प्रचारार्थ ८००० किलोमीटर पार करणारी  सायकलस्वार), मुसर्रत नईम शेख (मेहंदी आर्टिस्ट), श्रावणी राजेंद्र देसाई (क्रिकेट प्लेअर), स्वरूप राजीव काळे (एक्झिक्युटिव्ह शेफ), श्रावणी लडकत गाडगे (रिसर्चर), संदीप सुभाष दहिसरकर (अकॅडेमिशियन), आशिष शरद माने (गिर्यारोहक), शिवाजी जगन्नाथ राजगे (हॉटेल व्यावसायिक), श्रुती सतीश  अमृतकर (आर्किटेक्ट आणि एक्स्पर्ट इन पेपरआर्ट),ओवी विनय सातपुते (स्कुबा डायव्हर) ह्या दहा युवक-युवतींना त्यांच्या क्षेत्रातील भरीव कामगिरीकरता गौरवण्यात आले. ह्या असामान्य युवांचा सन्मान करून आजच्या तरुण पिढी समोर योग्य आदर्श निर्माण करणे हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश होता.

या सोहळ्याला विशेष अतिथी नोव्हेल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गोरखे आणि प्रमुख वक्ता म्हणून माजी प्रांतपाल एम जे एफ लायन बी.एल. जोशी सर लाभले होते .
आर सी लायन अनिल झोपे व आर सी लायन दिलीपसिंह मोहिते हे देखील उपस्थित होते. अतिशय दिमाखदार रीतीने संपन्न झालेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, पुरस्कारार्थींचे नातेवाईक व अनेक लायन्स सदस्य उपस्थित होते.

प्रमुख संयोजक लायन प्रा.शैलजा सांगळे, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन युथ आऊटरिच कमिटी आणि NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. वैभव फंड यांनी संयोजन समितीच्या मदतीने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन सीमा पारेख यांनी केले.

error: Content is protected !!