विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती
( भाग 2)..
नानांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत आपली भ्रमणगाथा सायकल वरच केली.
त्यामुळे त्यांची प्रकृती अतिशय काटक आणि कणखर राहिली .
भजन हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता .
तरुणपणी त्यांनी अनेक नाटकात स्त्री भूमिका केेल्या, अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आणि बक्षिसे मिळविली.
पांडुरंग म्हणता म्हणता पांडुरंग व्हावे असा भजनाचा त्यांना अभ्यास असल्यामुळे चिपळूणच्या 50 किलोमीटरच्या परिसरात ते आपले भजनी मंडळ घेऊन सायकलीने तो परिसर पिंजून काढायचे.
नानांनी शिक्षकांच्या तुटपुंज्या पगारात एक मुलगा आणि सात मुली यांच शिक्षण, लग्न सर्व काही अगदी आनंदात केल!
अस समृद्ध जीवन जगत असताना वयाच्या 87व्या वर्षी अल्जाइमर — स्मृतीभ्रंश हा आजार त्यांना झाला व हळूहळू त्यांची विस्मृती वाढत गेली!
आपल्या विद्यार्थ्यांचीही जन्मतारीख लक्षात ठेवणारे नाना आपल्या स्वतःच्या मुलांनाही केवळ आवाजानी ओळखायला लागले ,कारण त्यांना त्यांची नावं आठवायची नाहीत पण इतक असूनही ते समाधानी होते.
कारण …
“ठेविले अनंते तैसेची रहावे,
चित्ती असू द्यावे समाधान”.
हे त्यांच्या फक्त ओठातच नव्हत तर त्यांनी मनातही रुजवलं होतं!
अशा नानांना जवळजवळ आम्ही आठमहिने औषधोपचार करीत होतो ,पण शेवटी नानांनी आपली जीवनयात्रा संपविली!
तो दिवस होता 28 एप्रिल 2008.
त्यांच्या निष्प्राण देहाकडे पाहून मला कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या चार ओळी आठवल्या,–
” तक्रार नाही खंत नाही,
पूर्तीसाठी प्रवास असतो
कधीतरी मिटण्यासाठी
काळजा मधला श्वास असतो”.—
असंच नानांनी आपल ध्येय ठेवलं होतं!
या सर्व घटनेकडे पाहताना मी विचार करायला लागलो की, परमेश्वर असं का करतो?- ज्या बुद्धीच्या आणि विद्येच्या
बळावरती नानांनी आपल विश्व उभ केलं,उत्तम संसार केला, अनेक पिढ्या घडवल्या, तीच बुद्धी ,तीच स्मृती त्यांना शेवटी शेवटी का सोडून जाते ?
ज्यांच आयुष्य संपूर्ण ज्ञान आणि बुद्धीच्या तेजाने तळपणार, त्यांचे डोळे सदैव तेजस्वी,तेच डोळे अनोळखी वाटायला लागतात ,तीच नजर शुन्याकडे बघते ,त्यावेळी आपल मन उदास होतं!
केवळ नानाचं नाही ,तर अशा अनेक व्यक्तींच्या जीवनामध्ये त्यांचा कोणताही दोष नसताना अनोळखी ,अज्ञानी जीवन जगण्याच आयुष्य त्यांच्या वाट्याला यावं–
याचं उत्तर ज्यावेळी शोधण्याचा मी प्रयत्न करतो, त्यावेळी माझ्या अंतःकरणात एकच शब्द उमटतो तो म्हणजे प्रारब्ध! ….
पाप-पुण्याचा बॅलन्सशीट पूर्ण करण्यासाठी तो वर बसलेला परमेश्वर हे घडवून आणत असेल असंच मला काहीसं वाटतं!
आजही एखादा स्मृतिभ्रंश झालेला रुग्ण माझ्या समोर येतो त्यावेळी मला प्रकर्षाने आठवतात ते नाना विंचू गुरुजी आणि त्यांचा आजार अल्जाइमर स्मृतीभ्रंश!
आजचा विषय आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला असेल म्हणून मी येथेच थांबतो!—-
आपल्या सर्वांचा स्नेहांकित –लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी💐💐💐💐

error: Content is protected !!