विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती
( भाग – १)
लोभा वाकणकर वहिनींचा पाच वाजता फोन आला! डॉक्टर 95 वर्षांचे माझे वडील आहेत!! त्यांना मी माझ्या घरी औषधोपचारासाठी घेऊन आलेले आहे.
कृपया तुम्ही त्यांना तपासायला याल का ?
मी होय म्हटले आणि हॉस्पिटलचे राऊंड संपल्यानंतर लोभा वहिनींच्या वडिलांना तपासायला त्यांच्या घरी गेलो!
लोभावहिनींसह सर्व त्यांना नाना म्हणून ओळखत होते!.
हीच माझी नाना उर्फ विंचू गुरुजींची पहिली भेट!
तपासल्यानंतर सहजपणे काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या
त्या अशा— नानांना आपलं नाव सुद्धा आठवत नव्हतं! स्थळ-काळ-वेळ याचं त्यांना भानही नव्हतं!
बरेच दिवस भूक मंदावल्यामुळे चेहरा व सर्व शरीर सुकत चालल होत! .
स्वतःचे नित्यविधी सुद्धा करण्याच त्राण त्यांच्या शरीरात नव्हतं! .
वयोमानामुळे शरीराची अवस्था एखाद्या जीर्ण होत चाललेल्या वस्त्रासारखी होत चालली होती!
सर्वप्रथम त्यांना हायड्रेशन करणं आणि त्याचबरोबर आवश्यक ते अन्नरस आणि जीवनसत्व देण आवश्यक होतं!
त्यानुसार मी औषधोपचाराला सुरुवात केली! आणि बघता बघता आठ दिवसातच विंचू गुरुजींच्या प्रकृतीत फरक जाणवायला लागला!
सुकत चाललेलं शरीर ताजंतवानं दिसायला लागलं!
ज्या व्यक्तीला अंथरुणातून उठण्याच सुद्धा त्राण नव्हतं ती व्यक्ती आता उठून बसायला लागली! व्हीलचेअरवर बसून लोभा वहिनींच्या बंगल्यातील बैठकीत येऊन वेगवेगळ्या गाण्यांच्या काव्यपंक्ती आपल्या स्वतःच्या कानांनी ऐकून आनंद घ्यायला लागली! आमच्या
औषधोपचारा बरोबरच नानांच्या प्रकृतीने प्रतिसाद देणं हे जेवढं महत्त्वाचं होतं तेवढीच त्यांची नर्सिंग काळजी घेणं हे ही तितकच महत्त्वाचं होतं!
हे काम लोभा वहिनीं अत्यंत मनापासून करीत होत्या!
त्यामुळेच अतिदक्षता विभागातील एखाद्या अद्ययावत रुग्णालयात जसा रुग्ण हाताळला जातो ,त्याच पद्धतीने सर्व वाकणकर कुटुंबीय आपल्या नानाची काळजी घेत होते! आणि त्यामुळेच नानांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तृप्तता ,समाधान व आनंदाची छटा मला दिसायला लागलेली होती!
जसजसा नानांच्या सानिध्यात मी डॉक्टर या नात्याने आलो, तसतसा त्यांचा जीवनपट माझ्यासमोर उलगडायला लागला!
नानांचा जन्म सामान्य कुटुंबातला! वयाच्या दहाव्या वर्षी नानांच पितृछत्र हरपल! त्यामुळे अतिशय कष्टात त्यांचं बालपण गेलं! .
जिद्द ,मेहनत करण्याची तयारी आणि कायम जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक विचार ही त्यांची स्वभाववैशिष्ट्य बनलीत!
सातवीची परीक्षा पास झाल्याबरोबर त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली! त्याच बरोबर इंग्रजीच्या परीक्षा त्यांनी दिल्या आणि एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून ते कार्यरत राहिलेत!
स्वतःचं वागणं अतिशय शिस्तबद्ध असल्यामुळे ते ज्या शाळेत असायचे त्या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर एक आरसा एक कंगवा, कुंकवाची बाटली असायची!
त्यांचा हेतू हा होता की प्रत्येक मुलाने आरशात पाहायचं आपली टोपी आरशात पाहायची! केस बाहेर येऊ द्यायचे नाहीत! प्रत्येक मुलीने कुंकू लावलेल असलंच पाहिजे!
त्यामुळेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला विंचू गुरुजींच्या
कवायतीतील मुल उठून दिसायचीत! .
गुरुजींचे व्यक्तिमत्व प्रभावशाली आणि वाणी परिणामकारक असल्याने त्यांचे विद्यार्थी अनेक उच्चपदावर विराजमान झालेत.
अशा विद्यार्थ्यांनीची ज्यावेळी त्यांची गाठ पडायची ,त्यावेळी त्यांची छाती अभिमानाने भरून यायची!
विद्यार्थ्यांच्या यशात आपलं यश सामावलेल आहे हाच विचार त्यांना विलक्षण आनंद देऊन जायचा! …. दुसरा भाग उद्याच्या अंकात!.
(शब्दांकन-ला.डाॅ.शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे