मिस्टर चौधरी पेशंटला ऍडमिट तुम्ही केलंत?
ना नाही …
हो ना .
मग ज्यांनी पेशंटला ऍडमिट केलं त्यांनाच पेशंटला हलवण्याचा अधिकार पोहोचतो आणि
पेशंटला ॲडमिट केलं त्यांना घेऊन या ते मला तसं लिहून द्यायला तयार असतील ,तर मी या क्षणाला पेशंटला सोडायला तयार आहे!
माझी पाचर घट्ट बसली! तो उठला त्याच्या उभट चेहऱ्यावर वेगळेच भाव पसरले!
कडवट हसत तो म्हणाला डॉक्टर ,वहिनींना का एडमिट केलं हे मला ठाऊक आहे.
तुम्हीही त्यांना सामील दिसता,
ठीक आहे मी पोलीस कंप्लेंट करेन!
त्याची भाषा ऐकून माझ्या कपाळावरची शीर ताठ उभी राहिली!
लुक जेंटलमन– पोलीस कंप्लेंट अशी धमकी ऐकल्याबरोबर भिऊन जाणारा मी नव्हे! खूप उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत मी! तुम्ही तुम्हाला हवा तो अर्थ लावा मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही!
” नऊ गेट आऊट ऑफ फ्रॉम हीअर अँड डोन्ट डेअर टू कम अगेन!”.
मला डॉक्टर भंडारी म्हणतात लक्षात ठेवा! जा तुम्हाला काय करायचं असेल ते करा!
तो निघून गेला पोलिस कंप्लेंट करण्याइतकी त्याची हिंमत होणार नाही हे मी जाणून होतो! पण तरीही न जाणो काही चमत्कारिक घडलच तर काय कराव? या विचारात मी गर्क झालो!
साधारण एक आठवड्याने सुनीता ठीक झाली! घडलेल्या एकूण प्रकारान आपलं आयुष्य उध्वस्त होणार आहे याची तिला पूर्ण कल्पना आली होती!–
तिला डिस्चार्ज देताना तिची आर्त आणि व्यथित नजर पाहून मी ही आतून हेलावला गेलो!
रविवारचा दिवस क्लिनिकला संध्याकाळी सुट्टी असते!–
म्हणून मी घरीच होतो! वेळ संध्याकाळची होती.
‘सर- खाली एक तरुण तुम्हाला भेटण्यासाठी आलाय!’
दवाखान्यातल्या मच्छिंद्रनं वर येऊन सांगितल!–
वर पाठवून दे त्याला_ मी जबाब दिला! . जरा वेळानं जिन्यावर पावलं वाजली मी दरवाजाकडे पाहिल! दारात एक तरुण उभा होता — मध्यम बांधा ,निमगोरा वर्ण, बेताची उंची. येऊ का आत ? त्यानं विचारलं . मी मान हलवून होकार दिला! तो आत आला समोरच्या सोफ्यावर बसला!. मी स्तब्ध होतो तो माझ्याकडे पाहत होता. त्याच्या मुद्रेवरचे भाव झरझर बदलत होते! शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला– डॉक्टर मी प्रभाकर माने
माझ्या लक्षात त्याच्याविषयीचा कोणताही संदर्भ आला नाही!
तो पुढे म्हणाला जरा बोलायचं होतं!
बोला …..
डॉक्टर !
तो कसल्यातरी मानसिक दडपणाखाली आहे हे मी ओळखलं! .
आधी एक शंका मनाला चाटून गेली की नको तिथे शारीरिक संबंध आल्यावर जडलेल्या शारीरिक व्याधीमुळे डॉक्टरांच्याकडे जाणारा असाच
चाचपडत असतो!
हा पण तसाच संदर्भात आलाय की काय ?
पण त्याच्या चेहऱ्यावरून तसं काही नसावं असं वाटतं .
त्याला बोलत करण्याच्या उद्देशाने म्हटलं ….
बोला माने निसंकोचपणे बोला…
डॉक्टर सुनीता कशी आहे?
सुनिता ….हो ठीक आहे ती.
मी झटकन सावध झालो.
तिचा दीर माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला .
हा त्याचाच कोणी साथीदार असणार ,नक्की .
डॉक्टर सुनीताला अबोर्शन वेळी खूप त्रास झाला का?
तिची तब्येत आता ठीक आहे ना ?
लूक जेंटलमन ,
सुनीता अबोर्शन …
डॉक्टर मला वस्तुस्थिती ठाऊक आहे .
व्हॉट डू यु मिन?
हो सुनिता माझी प्रेयसी होती.
आम्ही एका मोहाच्या क्षणाला बळी पडलो .
लग्न करणार होतो आम्ही पण तिला घरी सांगताच आलं नाही.
आई हृदय विकाराची पेशंट माझही बस्तान अजूनही नीट बसलेलं नव्हतं.
त्यामुळे लग्न केलं पाहिजे हे माहीत असतानाही मी लग्न करू शकत नव्हतो .
व्यवहार माझ्यासमोर होता.
माझी स्वतःची जबाबदारी मला नीट उचलता येत नव्हती, त्यात लग्न करून तिची जबाबदारी मी कशी उचलणार.
अहो माने तुम्ही एवढे भानावर होतात मग लग्नाआधी ..!
डॉक्टर ही चूक माझ्या हातून झाली खरी मला त्याबद्दल फार वाईट वाटतं .
माने या खेळात एका अश्राप पोरीची होळी झालीय .
लग्नानंतर एक-दीड महिन्यात ती प्रेग्नेंट राहिली होती .
ही घटना तिच्या सासरकडच्या लोकांना समजली ,आता हे गुपित ठेवण्याचा प्रयत्न कितीही केला, तरीही ते गुपीत राहणार नाही .
तिच्या सासरचे हे निर्माल्य स्वीकारणार नाहीत ,
बरं आपला समाज म्हणजे चावडी लक्तरं वेशीला कशी सांगायची हे समाजाला फार चांगलं माहितीय.
‘ डॉक्टर मला फार पश्चाताप होतोय हो …’
मूर्ख माणसा तुझ्या या चुकीला क्षमा नाही .
डॉक्टर मला तिला भेटायचे तिच्या घरी जाता येत नाही म्हणून मी इथे आलो.
शट अप यू …
संतापानं माझ अंग थरथरायला लागलं.
माने तुम्ही जा तुमच्याशी मला एकही शब्द बोलायची इच्छा नाही.
मी उठून निघून गेलो तोही केव्हातरी गेला असावा .
सोमवार तसाच गेला,
मंगळवारी पूर्ण सुट्टी मी घरीच होतो दोन-तीन पेशंट पाहिले.
कन्सल्टींग रूमचा दरवाजा उघडून सुनीताचे आई-वडील आत आले .
खुर्चीत बसता बसता सुनीताच्या आईला हुंदका फुटला सुनिताच्या वडिलांचे डोळे भरून आले .
गडगडणाऱ्या आवाजात ते म्हणाले ,
डॉक्टर संपलं सारं….!
म्हणजे मी ताडकन उभा राहिलो! ..एक अभद्र शंका मनाला चाटून गेली!–
डॉक्टर सुनीताच्या सासरकडच्याने घटस्फोट मागितला आहे! त्यांना कळून चुकलयं
सुनिता ..?
ती ठीक आहे पण पार कोसळून गेली हो माझी पोर!
खात नाही ,पित नाही सारखी रडतेय ,सुकून गेलीय–
मला कल्पना आहे सुनीताच्या आई! ,आता आपण तिला सावरायला हवं! हे ही दिवस निघून जातील!– .
काळासारखं दूसरं औषध नाही!
पण डॉक्टर आता तिचं लग्न होणं देखिल कठीण आहे!
तिला कोण पत्करणार ….?
मी …!
खाडकन कन्सल्टिंग रूमचा दरवाजा उघडला गेला आणि कणखर शब्द आत घुसले .
आम्ही दाराकडे पाहिल- दारात प्रभाकर माने उभा होता!_- .
त्याचा चेहरा निश्चयी दिसत होता! .
तो आत आला माझ्या समोर बसत त्याने त्याची नजर माझ्या नजरेला भिडवली! .
नजर शांत होती ,आश्वासक होती!
सुनीताचे आई-वडील अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होते.
तो माझ्याकडे बघत होता.
डॉक्टर …त्याचा कणखर स्वर उमटला !-
डॉक्टरसाहेब परवाचं तुमचं बोलणं मला फार झोंबल पण सर- तेव्हा आयुष्याला स्थैर्य नव्हतं म्हणून मी काहीच बोललो नाही!.
काल मला कायम झाल्याचं पत्र कंपनीकडून मिळाल त्या पत्रासाठीच मी थांबलो होतो!.
हे पत्र मिळाल्यावर मी
सुनिताशी लग्न करायचं ठरवलं होतं .
आता कसलीही चिंता नाही मला माझ्या चुकीबद्दल प्रायश्चित घ्यायला हवं! .
आत्तापर्यंत आमचं बोलणं ऐकत असतानाच सुनीताचे वडील संतापले .
मी प्रभाकरला बाहेर जायला सांगितल! .
हे पहा तुमचं संतापण स्वाभाविक आहे! पण जरा शांत डोक्याने विचार करा …
सुनीताच सासर उध्वस्त झालयं, तिचं अजून उभ आयुष्य जायचयं .आपल्या समाजात असं विस्कळीत आयुष्याला स्थान नाही.
तिचं पुन्हा लग्न होणं हे किती अवघड आहे याची तुम्हाला मी जाणीव करून द्यायला पाहिजे असं नाही .
तेव्हा चालून आलेला हा पर्याय स्विकारण आता योग्य होणार आहे .
प्रभाकर तिच्याशी लग्न करायला तयार आहे!
लग्नाआधी घडलेल्या चुकीचं प्रायश्चित त्याला घेऊ द्या .
त्या दोघांचही कल्याण आहे.
सुनीताला हवा तो
जीवनसाथी मिळेल आणि तिच्या आयुष्याचा प्रश्न तुम्हालाही पडणार नाही.
मी त्यांना समजावलं!
माझं म्हणणं त्यांना पटलं असावं, पण त्यादिवशी ते काहीही बोलले नाहीत .
प्रभाकरशी मी थोडा वेळ बोललो.
तोही निघून गेला .
त्यानंतर जवळजवळ महिन्यांनी अशाच एका संध्याकाळी मी पत्नीसह वर बसलो होतो.
मावळतीचा रंग आसमंतात पसरला होता.
मंद मंद वारा अंगावर घेत डोळे बंद करून मी इझी चेअरवर पहुडलो होतो !
तेवढ्यात माझ्या पायांना कोणाच्यातरी हातांचा स्पर्श झाला.
मी गडबडून डोळे उघडले.
प्रभाकर आणि सुनीता माझ्या पायाशी वाकले होते .
सुनीताचे आई-वडील अश्रू पुसत मागे उभे होते.
मी त्यांना वर उठवलं.
सुनीताच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती! माझ्या पत्नीने तिला मिठीत घेतलं.
एक जीवन वाचवून सहजीवन देणाऱ्या डॉक्टरांबद्दल वाटणारा आदर अश्रूंच्या पारदर्शनातून स्पष्ट दिसत होता!
प्रभाकरही विलक्षण गंभीर झाला होता!
मी त्यांना सावरलं! दोघांचं मनःपूर्वक
अभिनंदन केलं!
सुनीताच्या आई-वडिलांनी मला हात जोडले1
मला भरून आलं! माझ्या पत्नीच्या डोळ्यातही पाणी चमकलं!– .
मावळतीच्या सांज प्रकाशात ती दोघं माझा निरोप घेऊन निघाली–
त्यांच्या सावल्या मोठ मोठ्या होत होत्या —
जा सुनिता…
विश यू बेस्ट ऑफ लक…!
( शब्दांकन-ला.डॉ.शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!