🙏”ज्ञानेशांचा संदेश”🌻9
“सार्थ हरिपाठ”
अभंग ६ वा
अभंगाचा भावार्थ :
साधुंच्या-संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला अनुभवाने झाला तो न उरून उरतो-मरतो, म्हणजे स्वतःच्या अधिष्ठानात ”मरून” उरतो.
ज्याप्रमाणे कापूर अग्निच्या स्पर्शाने अग्निरूप होतो व नंतर तो अग्नीही नाहीसा होऊन त्या ठिकाणी केवळ आकाश शिल्लक राहते, त्याप्रमाणे आत्मानुभवाचा प्रसाद झाल्यावर साधकाच्या जीवभावाचे “ब्रम्हभावात” रूपांतर होते व शेवटी तो ब्रम्हभाव सुध्दां विलयाला जाऊन केवळ “नाम” तेवढे शिल्लक राहते.
जो साधुंचा अंकित आहे, त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागणारा आहे, अशा हरिभक्तालाच मोक्ष मिळण्याचे भाग्य मिळते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, …
“ज्याला संतसंगतीची गोडी लागली त्यालाच हरी सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो”.
थोडक्यात स्पष्टीकरण :
साधुबोध झाला नुरोनिया ठेला।
ठायीच मुराला अनुभवे।।
साधू , संत किंवा सद्गुरू उपदेश सर्वांनाच करतात पण त्या उपदेशाचा बोध मात्र थोड्यानाच होतो. हा बोध दोन प्रकारचा असतो. एक तर्काच्या अधिष्ठानावर झालेला समजुतीचा बोध व दुसरा “अनुभवाच्या अधिष्ठानावर” झालेला “प्रत्यक्ष” बोध.
या दोन बोधांतील अंतर दोन ध्रुवाइतके आहे. हे अंतर तोडण्यासाठी संतमायबाप आपणाला साधना करण्यास सांगतात. सर्व साधनांचे सार म्हणजे “भगवन्नाम”. या ”नाम देवाच्या” उपासनेने, उच्चाराने साधकाच्या बुध्दीत प्रकाश पडतो, त्याची प्रज्ञा जागृत होते व त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध होतो. या बोधालाच “आत्मानुभव” असे म्हणतात.
✅ सूर्यकिरणांचे केंद्रीकरण भिंगाच्या ठिकाणी केल्यास तेथे अग्नी प्रगट होतो त्याप्रमाणे नामाच्या सतत उच्चाराने मन-बुद्धीच्या शक्तीचे केंद्रीकरण होऊन साधकाच्या अंत:करणात ज्ञानाचा प्रकाश पडतो. या प्रकाशात साधकाला आपल्या मूळ स्वरूपाचा प्रत्यक्ष बोध होतो.
या ज्ञानाच्या प्रकाशात साधकाला नामस्मरणाच्या साधनेची पाउले प्रशांतपणे, स्थैर्याने दृढ निश्चयाने टाकता येतात या साधनेची परिणती “भगवंताच्या ध्यासात” होऊन साधकाला “आत्मसाक्षात्कार” होतो.
या अनुभवाने साधक जीवभावाने मरतो व आत्मस्वरूपाने” उरतो. या स्थितीचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज कापुराचा दृष्टांत देऊन करतात. *कापुराची वाती उजळली ज्योति।* *ठायीच समाप्ति झाली जैसी।।*
ज्याप्रमाणे कापुराला अग्नीचा स्पर्श झाला की, तो अग्नीरूप होतो व शेवटी अग्नी सुध्दां नाहीसा होऊन केवळ आकाश शिल्लक राहाते.
त्याप्रमाणे जीवाला आत्मानुभवाचा स्पर्श झाला की त्याच्या अहंभावाचे सोहंभावात रूपांतर होते व त्याच्या जीवभावाचा लोप होऊन त्याच्या ठिकाणी “आत्मभाव” उदयाला येतो.
“मी देह आहे” हा अहंकार जातो व “मी आत्मा आहे” ही स्मृती जागृत होते. परंतु ही ”स्मृती” एक प्रकारची विकृतीच होय.
एखाद्या पुरुषाने ”मी पुरुष आहे” असे स्मरण करीत राहणे किंवा दुसऱ्यांना तसे सांगणे म्हणजे ती शुध्द विकृतीच होय . कारण आपण जे खरोखरीचे आहोत त्याची स्मृती असण्याची तरी काय जरूरी आहे ?
तात्पर्य, आत्मानुभव झालेल्या साधकाच्या ठिकाणी कांही काळ “मी आत्मा आहे” हा भाव स्फुरत राहतो. पण शेवटी हा भाव सुध्दां “स्वरूपात” मुरतो आणि केवळ नाम तेवढे शिल्लक राहते.
“बीज आणि फळ हरीचे नाम” असे तुकाराम महाराज म्हणतात, याचे कारण हेच होय! हे नाम साक्षात स्फुरद्रूप परब्रम्ह-चिदाकाश आहे असे नामधारकाला प्रत्यक्ष दिसते.
म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात —
नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ।
परब्रम्ह केवळ रामनाम।।
ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात म्हटले आहे –
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड।
गगनाहूनि वाड नाम आहे।
वर सांगितलेली स्थिती हाच संतांचा मोक्ष होय व या मोक्षाने विनटण्याचे भाग्य जो संतांना शरणागत आहे अशा हरिभक्तालाच प्राप्त होते. *मोक्षरेखे आला भाग्ये विनटला।* *साधुचा अंकिला हरिभक्त।।*
ज्ञानेश्वर महाराज सांगतात की,
संतसंगतीने-संतांना पूर्ण शरण गेल्याने, साधकाला मोक्षाचा लाभ तर होतोच पण शिवाय हरि आंत आणि बाहेर सर्वत्र भरून राहिलेला आहे असे दिसण्याचे परम भाग्य सुध्दा प्राप्त होते. *ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी।* *हरि दिसे जनी आत्मतत्वी।।*
संतसंगतीच्या गोडीची खूण म्हणजे भगवन्नामाची आवड. आवडीने व भावाने स्मरण करणाऱ्या साधकालाच वर सांगितलेला श्रेष्ठ अनुभव प्राप्त होतो.
म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांंना उपदेश करतात —
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️स. प्र.(sp)1033*
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस