सुख जवा पाडे– दुःख पर्वताएवढे!{ भाग क्रमांक 3}
मित्रांनो, अगदी थोडक्यात पण मोजक्या शब्दात मी जे वास्तव  सुरेखाला सांगितलं ते कदाचित तिला पटलं असावं कारण तिच्या डोळ्यात मला आनंदाश्रू दिसल. माझ्या पायाला स्पर्श करून तिने अत्यंत आत्मविश्वासपूर्वक माझा निरोप घेतला.

खरं तर मी हा प्रसंग रुग्णांच्या उपचारात विसरूनच गेलो होतो पण– ज्या आश्रमातून सुरेखा माझ्याकडे उपचारासाठी आली होती ,त्यांच्याकडून असं मला कळलं की— आमच्या हॉस्पिटलमधून आश्रमात परतल्यानंतर नेहमी उदास असणारी सुरेखा सर्वांना खरोखरच बदललेली दिसली! तिने पुण्याच्या एका महिलांच्या वसतिगृहात व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वीकारली होती! हे सर्व ऐकल्यानंतर मला खूपच आनंद झाला.

मित्रांनो निसर्ग आपल्याला खूप काही शिकवून जातो! जसे की– एखाद्या वेलीवर पुष्कळ फुलं फुलतात ,त्यातील काही देवदेवतांच्या मूर्ती वर विराजमान होतात तर काही फुलं नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणाऱ्या तरुणींच सौंदर्य वृद्धिंगत करतात तर काही फुलं एखाद्या वेड्या माणसाच्या हातात पडतात आणि तो क्षणार्धात त्यांचा चोळामोळा करून टाकतो तर काही फुल रानावनात आपोआपच सुकून जातात  आणि वेलीवरून अकाली गळून पडतात  तर काहीच निर्माल्य होतं अस आयुष्य वेगवेगळ्या फुलांना निसर्ग देत असतो पण ही फुलं आपल्या या सुखदुःखाच्या कहाण्या कुणालाच सांगत नाहीत.

पण माणसं मात्र आपलंच दुःख आपल्या उराशी कवटाळून आपल अमूल्य आयुष्य ओझं समजुन जगत असतात! वास्तविक जीवन एक आव्हानच आहे, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे! जर आपण जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला तर जसा—मित्रांनो सायकलवर जाणारा नेहमी मोटारीने जाणाऱ्या कडे बघतो जर त्याने त्याऐवजी पायी चालणाऱ्या कडे बघितलं तर तरच तो सुखी होईल असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं.

मित्रांनो या विचारावरच सर्व सुखाच सूत्र आधारलेल आहे!
या सुत्रा वरच समर्थ रामदास स्वामी म्हणतात–जगी सर्व सुखी असा कोण आहे! विचारी मना तुच शोधूनी पाहे!या समर्थांच्या मनाच्या श्लोकांचा आधार घेऊन आयुष्यात कितीतरी संकटे आली तरी त्यांना समर्थपणे तोंड देणारी माणसं मी पाहिलेली आहेत .

त्यातीलच एक म्हणजे आमच्या तळेगाव येथील शरद राव जोशी! पंडित जोशी सरांचा एकुलता एक तरुण मुलगा श्रीरंग अपघाताने या जगाचा निरोप घेतो पण जोशी सर खचून न जाता त्याच्या नावानं– श्रीरंग कलानिकेतन- नावाची संस्था उभी करतात आणि हजारो कलेची सेवा करणाऱ्या कलाकारांची निर्मिती करतात आणि आपलं जीवन अर्थपूर्ण जगून सार्थकी लावतात! समाजात एक आदर्श व्यक्तिमत्वाचा वस्तुपाठच देऊन जातात!माझा जिवलग मित्र मोहन जोशी यांचा पुतण्या मुकुंद जोशी अमेरिकेतील नोकरीसाठी निवडला जातो.

त्यासाठी त्याची मेडिकल केली जाते त्यात त्याची अकार्यक्षम किडनी सापडते त्यानंतर मुकुंद जोशीच पूर्ण जीवनच बदलून जातं पण तो खचून न जाता घरीच आपल्या कॉम्प्युटर वर कंपनीचं पूर्ण ताकदीनिशी कौशल्यपूर्ण काम करतो आणि आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्णपणे सांभाळण्यात यशस्वी होतो!कारण मुकुंदाला माहित आहे की– जीवनात जसे काटे आहेत तशी फुलेही आहेत कदाचित संख्येने कमी असतील पण त्यांचं अस्तित्व मात्र आपल्याला नाकारता येणार नाही! फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काटेरी मार्ग स्वीकारावा लागतो, इतकेच.

मित्रांनो शेवटी या घटना जवळून बघितल्यानंतर मला असं वाटतं की–
“जे अटळ अशक्य आहे, दे शक्ती सहाया| जे शक्य साध्य आहे ते ,निर्धाराने कराया!मग काय शक्य आहे ,अशक्य काय आहे| ते माझे मला कळाया| दे बुद्धी मला देवराया| दे बुद्धी मला देवराया!!

मित्रांनो याच विषयाला अनुसरून मला कवितेच्या चार ओळी आठवताहेत! आमचा कवी असं म्हणतो की–
“जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ|
जीवनात खुप दुःख आहे थोडं सोसून बघ!चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस रे बाबा| दुःखाचे डोंगर चढून बघ
यश मिळालं तर चाखून बघ

आणि जर– अपयश मिळालं तर थोडं निरखून बघ!
घर बांधणं कठीण असतं–
थोडे कष्ट करून बघ!
डाव मांडण कठीण असतं मग तो सारीपाटाचा असो वा संसाराचा असो| थोडं खेळून बघ!
जन्म-मरणं हे त्याहून कठीण असतं|
थोडं जगून बघ, थोडं जगून बघ!!”
(शब्दांकन- डॉक्टर शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे )

error: Content is protected !!