वडगाव मावळ:
मोरया प्रतिष्ठानच्या  पुढाकारातून शहरातील लहान मुलावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.

फेब्रुवारी महिन्यात वडगाव मधील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने वडगाव शहरात राबविण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला विविध रुग्णांनी भेट दिली होती. महाआरोग्य शिबिरला भेट दिलेल्या अतिशय तत्पर अशा या रूग्णांवर या मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत मोफत ऑपरेशन व उपचार करण्यात येत आहे.

आत्तापर्यंत शहरातील सुमारे सहा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यात मणका, गुडघे, डोळे, घसा, नाक इत्यादी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून शहरात वास्तव्यात असलेल्या वडगाव मधील अतिशय लहान अशा जावेद रेहमान या अकरा वर्षीय मुलाच्या हृदयाला छिद्र होते. त्यांच्या कुटुंबाची अर्थीक परिस्थिती खूप बिकट असल्याने त्या मुलाचे वय वर्षे तीन असल्यापासून ते आज अकरा वय वर्षे असे पर्यंत फक्त पैशाअभावी या कुटुंबाला या लहान मुलाचे ऑपरेशन करण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.

दोन दिवसांपूर्वी या अकरा वर्षीय जावेद वर पुण्यातील नामांकित अशा सह्याद्री हॉस्पिटल मध्ये हृदय शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. या लहान जीवाच्या मोठ्या ऑपरेशनसाठी मोरया प्रतिष्ठानला सहकार्य केलेल्या सनराईज मेडिकल फाउंडेशनचे सतीश कांबळे सर आणि रोशन मराठे तसेच सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले त्याबद्दल नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
गेली पंधरा वर्षापासून रेहमान कुटुंबीय वडगाव शहरात वास्तव्यास आहे. गेल्या महिन्यात राबविण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने या कुटुंबीयांची भेट झाली होती, त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती त्या कुटुंबीयांनी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांना दिली.

तद्नंतर ऑपरेशन साठी लागणाऱ्या शासकीय सेवेची मदत मिळवण्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे वैद्यकीय सेवेसाठी त्वरीत मिळणारे रेशनिंग कार्ड पाच दिवसातच काढून देण्यात आले आणि पुढील आरोग्य सेवेसाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि आज अखेर जावेद चे ऑपरेशन यशस्वी झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि अबोली ढोरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!