🌻”ज्ञानेशांचा संदेश”🌹
(प्रथम आवृत्ती १९६१)

“सार्थ हरिपाठ”
अभंग ३ रा *त्रिगुण असार निर्गुण हे सार ।* *सारासार विचार हरिपाठ ।।* *सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।* *हरिविण मन व्यर्थ जाय ।।*

अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
जेथुनि चराचर त्यासि भजे ।।
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
अनंत जन्मानी पुण्य होय ।।

अभंगाचा भावार्थ –
त्रिगुणात्मक प्रकृति व तिने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग सार आहे की असार आहे ? किंवा त्या जगाचे अधिष्ठान असलेले निर्गुण परब्रह्म हेच सार आहे ? वगैरे गोष्टींबद्दलचा विचार तू करीत बसू नकोस
कारण सारासार विचार करूनच संतांनी तुला हरिपाठाचा, हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे.

सगुण परमात्म्याला त्रिगुणात्मक प्रकृतिचा आश्रय घ्यावा लागतो, म्हणून तो कनिष्ट आहे की निर्गुण परब्रह्म हे अगुण, गुणातीत आहे, म्हणून ते श्रेष्ठ आहे, वगैरे विषयांत, हरिनाम न घेता मन घालशील तर तुझे जीवन व्यर्थ जाईल.

म्हणून जे अव्यक्त व निराकार आहे व ज्याला विशिष्ट आकार नाही आणि जेथून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ति होते त्या तत्वाचे, हरिचे भजन कर.

ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ,
जर तू हरिचे भजन करशील तर अनंत जन्माची पुण्याई फळल्यानंतर “रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी” अशी जी “उन्मनी” स्थिती स्थिती प्राप्त होते, ती स्थिती या जन्मातच तुला हरिनामस्मरणाने प्राप्त होईल.

थोडक्यात स्पष्टीकरण :
दुसऱ्या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाला जो उपदेश केलेला आहे तोच त्यांनी जरा निराळ्या शब्दांत या अभंगाच्या पहिल्या दोन चरणांत केलेला आहे .
त्रिगुण असार निर्गुण हे सार।
सारासार विचार हरिपाठ।।
सगुण निर्गुण गुणाचे अगुण।
हरिविण मन व्यर्थ जाय।।

निर्गुण म्हणजे गुण नाहीत असा त्याचा अर्थ नाही. जगामध्ये निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे गुण आहेत, त्यात त्रिगुण पण आले, सगुण, चांगले-वाईट गुण जिथून उदयाला येतात त्याला निर्गुण म्हणतात.

निराकार म्हणजे सर्व आकार जिथून साकार होतात त्याला निराकार म्हणतात. सर्वव्यापी म्हणजे जे जे काही आहे ते “सर्व व्यापतो” आणि “पुन्हा व्यापून उरतो”, तो सर्वव्यापी.

समोर दिसणाऱ्या विश्वाला बाजूला सारायचे आणि कुठेतरी जंगलात किंवा गुहेत किंवा खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेऊन डोळे मिटून देवाला पाहण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रकार संतांना मान्य नाही. कारण डोळ्यांना न दिसणारा परमेश्वर डोळ्यांना दिसावा म्हणून परमेश्वर आपले निर्गुण स्वरूप टाकून विश्वरूपाने सगुण साकार झाला.

ज्याला विश्वात परमेश्वर पाहता येत नाही त्याला निर्गुण-निराकार परमेश्वर स्वरूप कधीच आकळता येणार नाही.
म्हणून …..
✅सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ, त्रिगुणात्मक प्रकृतीने निर्माण केलेले हे जग सार की असार, याबद्दलचा विचार करीत बसून आपला अमुल्य वेळ खर्च करण्याचे साधकाला कांहीच कारण नाही.

कारण यासंबंधीचे निर्णय बुध्दीच्या पलीकडे जाऊन अनुभवानेच घ्यावयाचे असतात, म्हणून पूर्ण सारासार विचार करूनच संतांनी हरिनामाचा उपदेश केलेला आहे.

संत एकांती बैसले। सर्वही सिद्धांत शोधिले।।
ज्ञानदृष्टी अवलोकिले। सार काढिले निवडोनि।।
ते हे श्रीहरीचे नाम। सर्व पातका करी भस्म।।
अधिकारी उत्तम वा अधम। चारी वर्ण नर नारी।।

सर्व पूर्व पापांचे भस्म करणारे, अगणित पुण्याची कमाई करून देणारे, कष्ट रहित व खर्च रहित, चारी वर्णाच्या लोकांना व स्त्रियांना सहज घेण्यास सोपे असे सुंदर सारभूत साधन म्हणजे भगवन्नाम संतांनी शोधून काढले व सर्व जनतेला उदार अंत:करणाने बहाल केले.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र.(sp)1024

error: Content is protected !!