ज्ञानेशांचा संदेश”
(प्रथम आवृत्ती १९६१)
सार्थ हरिपाठ
अभंग २ रा( उर्वरित)
ज्ञानेश्वर महाराजांनी एका मोठ्या धोक्यापासून साधकाला सावध केले आहे.
ते सांगतात —
एक हरि आत्मा जीवशिव समा।
वाया तू दुर्गमा न घाली मन।।
हरि हाच आत्मा आहे व तोच जीवशिवांत समत्वाने आहे, इतकेच नव्हे तर सर्व काही ब्रम्हच आहे, वगैरे *मोठमोठे वेदांताचे सिध्दांत व तत्वज्ञान हे तत्वतः जरी खरे असले तरी साधकाने त्यात विशेष मन घालू नये.
कारण ……..
एकदां का तो या शब्दज्ञानात शिरला नि त्यांत मन घालू लागला की, *आपण मोठे ज्ञानी आहोत असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण होतो व लोक सुध्दा त्याला ज्ञानी असे समजून त्याचा मानसन्मान करू लागतात. याचा परिणाम इतका विपरीत होतो की *त्या साधकाला परमार्थ सिद्धी तर नाहीच प्राप्त होत पण त्याची अधोगती मात्र होते.
म्हणूनच साधकाने शब्दज्ञानात, शब्दजालात स्वतःला अडकवून न घेता अखंड नामस्मरणाचाच अभ्यास करावा असा ज्ञानदेव महाराज त्याला उपदेश करतात.
समर्थ रामदास स्वामींनी साधकाला हाच उपदेश केला आहे. ते म्हणतात, —
नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ति मोठी।
चढे गर्व ताठा अभिमान पोटी।।
घडे कर्म खोटे बहू हा दगा रे।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे।
तुकाराम महाराज सुद्धां आपणाला हेच सांगतात —
नको कांही पडो ग्रंथाचिये भरी।
शीघ्र व्रत करी हेचि एक।।
याचे दुसरे कारण असे की, —
तत्त्वज्ञानात सांगितलेले अंतिम सिध्दांत हे खऱ्या अर्थाने समजूच शकत नाहीत, कारण ते बुध्दीच्या ”पलिकडले”, असतात.
ते अंतिम सिध्दांत समजून घेण्याचा मार्ग एकच आणि तो म्हणजे “अनुभव”. *हा अनुभव साधकाला त्याच वेळेला प्राप्त होतो, ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी “प्रतिभा ज्ञान”, “दिव्य ज्ञान” किंवा “दिव्य चक्षू” प्रकट होतात.* हे दिव्य ज्ञान नामधारकाला नुसत्या नामाच्या अखंड उच्चाराने प्राप्त होते.
तुकाराम महाराज सांगतात, —
न कळे ते कळो येईल उगले।
नामे या विठ्ठले एकाचिया।।
न दिसे ते दिसो येईल उगले।
नामे या विठ्ठले एकाचिया।।
न बोलो ते बोलो येईल उगले।
नामे या विठ्ठले एकाचिया।।
तात्पर्य, …..
ज्ञानेश्वर महाराज व इतर संत आपणाला हेच सांगतात की, तत्वज्ञानाच्या मोठमोठया सिध्दांतांचा विनाकारण शाब्दिक कीस काढीत बसण्यात आपला अमूल्य वेळ खर्च न करता तोच वेळ “अखंड नामस्मरणाच्या” कारणी लावावा.
(क्रमशः)
— *सद्गुरू श्री वामनराव पै*
*✍️ स. प्र. (sp)1021*
- टाकवे येथील मित्रांनी १८ वर्षांनी एकत्र येऊन थंडीत वाटले गोरगरिबांना स्वेटर
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा