भीती __ एक अटळ अनुभूती{ भाग क्रमांक दोन}
मित्रांनो ,
गाडीच्या वेगा बरोबरच अशी आमची प्रश्नोत्तरे चालूच राहिली ! त्यात त्याने बोलता बोलता असे विधान केले की मी या परिसरातील सर्व हॉस्पिटलला मदत करतो मग मी सहज त्याला विचारले की तू सामाजिक कार्य करता आहेस का? मिश्किलपणे तो हसत हसतच म्हणाला की जी व्यक्ती माझं ऐकत नाही त्यांना मी मारतो.
हाफ मर्डर करतो फॅक्चर करतो आणि या मुंबई-पुणे रोडच्या आजूबाजूला असलेल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकतो! अशा वेगळ्या प्रकारे मी हॉस्पिटल ला मदत करतो की नाही? हे तो बोलत असेपर्यंत मी कोण आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती आणि म्हणून त्यानेच मला पुढचा प्रश्न विचारला की आपण काय करता?
मी पण त्याला चेहऱ्यावरती थोडं हसू आणत म्हटलं मी पण डॉक्टर आहे!हे ऐकल्यावर तो थोडा चमकलाच! पण क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला __ डॉक्टर साहेब मी जर आता तुम्हाला धारदार चाकू दाखवून तुम्हाला तुमची गळ्यातील चेन हातातील अंगठी खिशातील रोख रक्कम काढून लुटलं तर तुम्ही काय कराल?
हे ऐकल्यावर मी आतून हादरलो असलो तरी चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दाखवून त्याला म्हटलं की तू असलं काहीच करणार नाहीस! कारण माझा हेतू तुला मदत करण्याचा होता त्यामुळे तुझ्यातील सद्सद्विवेकबुद्धी तुला असं दृष्ट कर्म कधीच करू देणार नाही! त्यावर आपली कडवट प्रतिक्रिया व्यक्त करीत तो उत्तरला__ डॉक्टर साहेब अशा खोट्या भ्रमात राहू नका.
जग फार वाईट आहे अर्थात तुम्ही आता सांगता आहात त्याप्रमाणे मी तुम्हाला सोडतो आहे! हा आमचा असा गोड संवाद चालू असतानाच सोमटणे फाटा आला त्याने मला गाडी थांबवायला सांगितली आणि त्याने हसतच माझा निरोप घेतला!मित्रांनो ही अतिशय छोटी घडलेली घटना मला खूप अंतर्मुख करून गेली.
जे हे वरील प्रमाणे घडलं जर त्याच्याविरुद्ध त्याने सांगितल्याप्रमाणे घडलं असतं तर__ कदाचित मी हे सांगायला जिवंतही नसतो किंवा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यासाठी गेलो असतो! पण माणसाची सद्भावना असेल तर भीती तर सोडाच पण त्याला परमेश्वर अशीच वेगळी प्रेरणा बहाल करतो की त्याला कल्पनेच्या पलीकडील धैर्य तथा हिम्मत प्राप्त होते.
या माझ्या विधानाला पुष्टी देण्यासाठी इतिहासातील अनेक थोर पुरुषांच्या चरित्राचा जर आपण अभ्यास केला तर त्यात अशा कितीतरी घटना आहेत आणि त्यांची उत्तरे अजूनही सामान्य माणसाला समजत नाहीत! त्यापैकी एक उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर त्या काळातील समाजकंटकांनी मारेकरी घातले होते.
पण त्यांच हृदय परिवर्तन करण्यात ज्योतिबा फुले यशस्वी झालेत! जा इंग्रजांनी बागेत बेछूट गोळीबार करून अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतलेत अनेकांना फासावर लटकवले त्याच इंग्रजांना महात्मा गांधींवर हल्ला करण्याची हिम्मत कधीच झाली नाही! मित्रांनो अशावेळी असे वाटते की कोणती तरी अदृश्य शक्ती निश्चितपणे काम करीत असते ती या अपप्रवृत्तींवर ती मात करते.
म्हणूनच अशा संत प्रवृत्तींच्या व्यक्तींच जीवन सुरक्षित रहात!मित्रांनो शेवटी आपण निष्कर्ष काढूया की भितीपोटी मनाला खूप यातना होतात पण त्या बरोबरच चांगल्याही गोष्टी घडू शकतात! जसे परीक्षेच्या काळात नापासांची भितीमुळे मुलं अभ्यासाला लागतात आणि यशस्वी होतात! उद्योजक आपला उद्योग तोट्यात करू नये .
या भीतीपोटी अनेक उद्योजक आपल्या आरोग्याची काळजी घेतात आपला अपघात होईल यासाठी काळजीपूर्वक तो होऊ नये म्हणून प्रवास करतात! व्यवसायातील सध्याच्या स्पर्धेच्या युगात नवनवीन कल्पना आपल्या व्यवसायात प्रत्यक्ष उतरवतात! कायद्याची भीती असल्यामुळे रस्त्यावरील पादचारी तथा वाहन चालक वाहतुकीचे नियम कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतात.
मित्रांनो ,संपूर्ण प्रगतीचा समृद्धीचा आणि पृथ्वीचा मूलभूत पाया हा भितीवरच आधारलेला असतो म्हणूनच अशा भितीची अनुभूती वेळप्रसंगी प्रत्येकाला येणे आणि त्याला प्रसंगाला तोंड देण्याच् सामर्थ्य त्याच्या नकळत त्याला प्राप्त होतं! कारण खरोखरच त्याची प्रगती घडणे हीच यामागील परमेश्वरी योजना आहे.
( शब्दांकन – डॉ. शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)
- टाकवे येथील मित्रांनी १८ वर्षांनी एकत्र येऊन थंडीत वाटले गोरगरिबांना स्वेटर
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर
- भारतीय कालगणना विज्ञान आधारित – डॉ. अजय अपामार्जने
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा