करुणा –  एक भावनिक परमेश्वरी वरदान! { भाग क्रमांक दोन}
आदरणीय पद्मविभूषण गुरुवर्य डॉक्टर संचेती सरांच्या विषयी ऋण व्यक्त करण्यासाठी मी ज्यावेळी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला त्यावेळी त्यांच्या प्रत्येक शब्दातून आमचा रुग्ण बाळू घोरपडे या विषयी त्यांना वाटणारी करुणा मला जाणवली आणि ती डायरेक्ट माझ्या अंतःकरणाला भेटली!

मित्रांनो मागे वळून ज्यावेळी मी या घटनेकडे बघतो त्यावेळी सहाजिकच माझ्या मनात विचार येतो की– परमेश्वराने प्रत्येकाला जे जन्मताच हृदय दिलेल आहे त्या हृदयाच्या कुपीत अनेक सुगंधी द्रव्य भरलेली आहेत! त्यातली फक्त एक करुणेची कुपी उघडण्याचा अवकाश की तिच्यातून दरवळणाऱ्या सुगंधित शक्तीमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की कोणाचेही ती शक्ती कल्याण करू शकते!

अर्थात या करुणेच्या अस्तित्वाची जाणीव प्रसंगानुसार प्रत्येकाला जाणवत असते!तो अनुभवही त्याला येत असतो पण त्याचं प्रत्यक्षात जोपर्यंत कृतीत रुपांतर होत नाही तोपर्यंत या करुणेच्या जाणिवेला काही अर्थ नाही!मित्रांनो बाळु घोरपडे विषयी वाटणार्‍या करुणेचा हा उगम त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या त्याच्या मित्रांना आणि त्याच्या नातेवाईकांना निश्चितच जाणवला असेल!

पण त्याची दखल मात्र फक्त आणि फक्त कांबळे सरांनी घेतली आणि ती प्रत्यक्ष कृतीत आणली एवढेच नव्हे तर ती आमच्या मार्फत आमच्या गुरूंना म्हणजेच डॉक्टर संचेती सरांच्या पर्यंत पोहोचली आणि बाळू घोरपडे च्या आयुष्याच कल्याण झालं!म्हणूनच मित्रांनो जय जवळी आपल्याला या करुणेच्या अस्तित्वाची जाणीव होईल त्यावेळी तिचं कृतीत जर रूपांतर झालं तर निश्‍चितच प्रत्येकाचं जीवन हे अर्थपूर्ण होईल यात तिळमात्र शंका नाही!

कांबळे सर आणि माझे गुरु डॉक्टर संचेती यांच्या ह्रुदयात असलेल्या करुणेची अनुभूती जशी मला मिळाली ती आपल्या प्रत्येकाला मिळो हीच त्या निर्गुण निराकार परमेश्वर चरणी प्रार्थना करतो!
( शब्दांकन -डॉक्टर शाळीग्राम भंडारी)

error: Content is protected !!