![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/03/Picsart_23-03-18_14-39-02-160-1024x680.jpg)
प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला – प्रा. व. बा. बोधे
गणेश व्याख्यानमाला – पुष्प पहिले
तळेगाव स्टेशन :
“प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला असतो; मात्र तो शोधण्याची निर्मळ दृष्टी माणसाकडे हवी!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांनी श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव-दाभाडे स्टेशन येथे केले.
श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘हास्यमेव जयते!’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना प्रा. बोधे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे माजी अध्यक्ष संतोष शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखाध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, सचिव दिलीप राजगुरव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. “अॉनलाईनच्या काळातही प्रत्यक्ष व्याख्यानमालांचे महत्त्व अबाधित आहे!” असे विचार श्रीकृष्ण पुरंदरे यांनी मांडले. महादेव वर्तले यांनी प्रास्ताविकातून श्री गणेश प्रतिष्ठानच्या चौतीस वर्षे आणि गणेश व्याख्यानमालेच्या अकरा वर्षांच्या कालावधीतील विविध बाबींची माहिती दिली.
संतोष शेळके यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “व्याख्यानमालांच्या माध्यमातून वैचारिक क्रांती निश्चित घडते!” असे मत व्यक्त केले. व्याख्यानापूर्वी, वानप्रस्थ आश्रम या संस्थेच्या माध्यमातून वृद्धांची देखभाल आणि कौटुंबिक समुपदेशनाद्वारे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ऊर्मिला छाजेड यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मान करण्यात आला.
प्रा. व. बा. बोधे पुढे म्हणाले की, “विनोद हे मानवी जीवनातील एक महत्त्वाचे अंग आहे. लहान मुलांपासून प्रत्येकाला विनोद आवडतो. कोणत्याही खेड्यातील पार हा मुक्त विद्यापीठासारखा असतो अन् तेथे इरसाल ग्रामीण विनोदाची सहजनिर्मिती होते. सामान्य माणसांच्या दैनंदिन वागण्याच्या विसंगती आणि उच्चपदस्थ लोकांच्या सवयी यांमध्ये विनोद आढळून येतो.
वगनाट्यातील विनोद जिवंत अन् उत्स्फूर्त असतो. महिलांच्या निरागस भाबडेपणातून निर्मळ विनोद अनुभवता येतो; तर गरिबीत जगतानाही गमतीदार अनुभव येतात. कितीही प्रतिकूल काळ आला तरी आनंदात कसे राहावे, हे आचार्य अत्रे यांच्या जीवनाकडे पाहिल्यावर महाराष्ट्राला समजले. कवी आणि कलावंत यांचा तऱ्हेवाईकपणा हास्यास्पद असतो. ‘एकच प्याला’ या नाटकातील तळीरामच्या खुमासदार संवादात अभिजात विनोद आहे; तर कारुण्याची झालर असलेला विनोद श्रेष्ठ असतो, हे पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येते!
” बच्चुशेठ तांबोळी, उमाकांत महाजन, राजेश सूर्यवंशी, मयूर राजगुरव, सतीश देशपांडे, रामभाऊ कदम, चंद्रकांत घोजगे, संपदा पाटील यांनी संयोजनात परिश्रम घेतले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप राजगुरव यांनी आभार मानले.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/03/PicsArt_12-30-07.46.49-14-761x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/03/Picsart_22-06-18_11-25-00-456-29-199x300.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/03/Picsart_22-08-30_16-40-52-618-29-1024x932.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/03/Picsart_23-01-27_14-17-04-135-7-717x1024.jpg)