पिंपरी:मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून २६ जानेवारी २०१८ साली तत्कालीन आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे केलेल्या धरणे आंदोलनात पिंपरी – चिंचवड येथून महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या सक्रीय सहभागाबद्दल माधवराव पटवर्धन सभागृहात  झालेल्या समारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला.
दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात पिंपरी – चिंचवड येथून राजन लाखे तर सातारा येथून शाहूपुरी शाखेचे तत्कालीन अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, डॉ. राजेंद्र माने, वजीर नदाफ, नंदकुमार सावंत आदींचाही समावेश होता. तदनंतर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने केंद्र सरकारने ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला.
आताच्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले पुन्हा आमदार म्हणून निवडून आले; आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि सरहद संस्था पुणे यांनी आयोजित केलेल्या या कृतज्ञता सोहळ्यात नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते राजन लाखे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. दिल्ली येथील आंदोलनाआधी राजन लाखे यांनी पिंपरी – चिंचवडमधून पंतप्रधानांना त्यावेळी दहा हजार पत्रे पाठवली होती; तसेच मराठी भाषेसाठी प्राध्यापकांचा परिसंवाद घेऊन त्यांची मते जाणून घेऊन पिंपरी – चिंचवड शहरात अभिजात भाषेसाठी व्यापक चळवळ सुरू केली होती. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तब्बल सात वर्षांनी विनोद कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी शिवेंद्रराजे यांनी दिल्लीतील सदर आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला.
संजय नहार यांनी प्रास्ताविक केले; तर शैलेश पगारिया यांनी आभार मानले.

error: Content is protected !!