
‘
पिंपरी : ‘धर्मासाठी मृत्यूला कवटाळून संभाजीमहाराज अमर झाले!’ असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘छत्रपती संभाजीमहाराजांची राजनीती’ या विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना डाॅ. केदार फाळके बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले अध्यक्षस्थानी होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे, ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, जितेंद्र देव, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
धीरज गुत्ते यांनी प्रास्ताविकातून गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. किसनमहाराज चौधरी यांनी, ‘सातत्याने चौतीस वर्षे जिजाऊ व्याख्यानमालेसारखा उपक्रम राबविणे ही कौतुकास्पद बाब आहे!’ असे गौरवोद्गार काढले. श्रीकांत चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘इतिहासलेखनात साधनांचे खूप महत्त्व असते. छत्रपती संभाजीमहाराज यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा ‘राधामाधवविलासचंपू’ यासारखा मौलिक ग्रंथ वि. का. राजवाडे यांना चिंचवडगावातील रबडेवाड्यात मिळाला, ही गौरवास्पद गोष्ट आहे!’ असे मत मांडले.
डाॅ. केदार फाळके पुढे म्हणाले की, ‘राजकारण आणि राजनीती या दोन भिन्न गोष्टी आहेत. १४ मे १६५७ रोजी जन्मलेल्या आणि ११ मार्च १६८९ रोजी बलिदान स्वीकारलेल्या संभाजीमहाराज यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले. इतिहासात आढळून आलेल्या त्यांच्या पहिल्याच पत्रात छत्रपती शिवाजीमहाराज यांचे ध्येय घेऊन मला पुढे वाटचाल करायची आहे, असे नमूद केले होते. २६ जानेवारी १६७१ रोजी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ झाला. मुलकी आणि लष्करी प्रशिक्षण घेऊन ते विधिवत युवराज झाले. रायगडाला स्वराज्यातील दोन छत्रपतींचा राज्याभिषेक पाहण्याचे भाग्य लाभले. छत्रपती शिवाजीमहाराज यांचेच अष्टप्रधान मंत्रिमंडळ घेऊन छत्रपती म्हणून राज्यकारभाराचा प्रारंभ करण्याऱ्या संभाजीमहाराजांना
नऊ वर्षांची देदीप्यमान कारकीर्द लाभली. अनन्वित अत्याचार सहन करून त्यांनी धर्मासाठी बलिदान दिले. हिंदुंची असंख्य मंदिरे उद्ध्वस्त करणार्या
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे!’ चित्रफितीच्या माध्यमातून डाॅ. केदार फाळके यांनी सनावळींसह तपशीलवार माहिती देत संभाजीमहाराज यांची राजकीय कारकीर्द, न्यायव्यवस्था, जमीन महसूलव्यवस्था, अर्थव्यवस्था, वतनव्यवस्था, जंजिरा आणि गोवा या दोन महत्त्वाच्या पण पूर्णत्वाला न गेलेल्या मोहिमा, मराठ्यांची दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले. ‘राधामाधवविलासचंपू’ या ऐतिहासिक ग्रंथातील आणि कवी भूषण रचित छंदांचे सादरीकरण करीत डाॅ. फाळके यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.
संदीप जंगम, महेश गावडे, नितीन हिरवे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.
- आढले खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेंद्र भोईर बिनविरोध
- मावळात राष्ट्रवादीच्या ‘गौरव महाराष्ट्र रथयात्रेचे जल्लोषात स्वागत
- उपेक्षित कामगारांच्या स्वेदगंगेचा सन्मान झाला पाहिजे!’ – प्रा. डाॅ. राजा दीक्षित
- मराठी भाषा आंदोलक म्हणून राजन लाखे यांचा सत्कार
- भारत सरकारच्या आयुष मंत्रालय “योग प्रमाणी करण मंडळाच्या “योग तज्ञ” पदी कैवल्यधाम योग संस्थेचे सुबोध तिवारी यांची नियुक्ती

