वडगाव मावळ :  माणसे पैशाने मोठी असण्यापेक्षा कर्तुत्वाने मोठी असावी.आयुष्यात चांगले वागा असा सल्ला समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी दिला.
येथील श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त व माजी सरपंच दिवंगत सोपानराव म्हाळसकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनसेवेप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,सहकार महर्षी माऊली दाभाडे,उद्योजक शंकराव शेळके, आमदार शंकर मांडेकर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे,बाबुराव वायकर, नंदकुमार शेलार,उमेश बोडके, विलास कातोरे,बबनराव भोंगाडेसह श्री पोटोबा देवस्थानचे विश्वस्त, आजी माजी नगरसेवक, पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील वारकरी,ग्रामस्थ,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी वैराग्य मूर्ती हभप शंकर महाराज मराठे, हभप पंकज महाराज गावडे, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, हभप तुषार महाराज दळवी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ह.भ.प. देशमुख महाराज म्हणाले, “,संत हे वारकरी संप्रदायाचे प्राण आहेत.संतांच्या विचाराशिवाय कलियुगातील मनुष्य जगू शकत नाही.अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते. आणि ज्ञानापेक्षा देवाचे ध्यान श्रेष्ठ आहे.कर्म हाच देव आहे असे सांगत आत्मा एकच आहे आणि तो नित्य आहे. मरताना चैतन्य जाते, देह जात नाही,शरीर जात नाही आणि आत्माही जात नाही. मात्र; चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे स्वर्ग,नरक करीत राहू नका, फक्त भजन करीत रहा .

श्री पोटोबा देवस्थानच्या वतीने सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या शिबीरासाठी मोठा प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता कुडे, अतुल राऊत,रवींद्र म्हाळसकर यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भास्करराव  म्हाळसकर व भरत म्हाळसकर, म्हाळसकर  परिवार व श्री पोटोबा देवस्थान ट्रस्टने परिश्रम घेतले.

error: Content is protected !!