पिंपरी : ‘देशी खेळ कुस्ती मातीत पूर्वापार खेळत होते. आता गादीवरची कुस्ती आली आहे. त्याचा अभ्यास आणखी वेगळा असतो. त्यामुळे जागतिक क्रीडा स्पर्धेत टिकायचे असेल तर आपल्या मानसिकतेमध्ये तसेच तंत्रात आमूलाग्र बदल करणे काळाची गरज आहे!’ असे प्रतिपादन बजाज ऑटो लिमिटेड, आकुर्डी कारखान्याचे माजी क्रीडा अधिकारी वसंत ठोंबरे यांनी पिंपळे गुरव येथे गुरुवार, दिनांक २७ मार्च २०२५ रोजी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त  केले.
      भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळे गुरव येथे ‘जागतिक क्रीडा स्पर्धा आणि आजचा भारत’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. याप्रसंगी क्रीडा समालोचक पंकज पाटील, जानकीदेवी ग्रामविकास संस्थेचे माजी सचिव विश्वास सोहनी, एलसीसीआयए पीसीएमसी चाप्टरचे क्रीडा संयोजक महेश बोरोले, मराठवाडा जनविकास संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक उपस्थित होते.
       वक्ते पंकज पाटील म्हणाले, ‘क्रीडा स्पर्धा आणि अवकाश संशोधन संस्थेतील यशाला लवकर जागतिक कीर्ती मिळते. कठोर मेहनत, शिकण्याची जिद्द अंगीकारल्यास क्रीडा क्षेत्राबरोबरच कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्ती होते. या अशा विभिन्न क्षेत्रातील यशामुळेच विकसित भारत घडू शकतो. भारतीय सेनादलामध्ये छोट्या मुला मुलींना घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन खेळाडूंची वेगळी बटालियन बनवली पाहिजे. असे केल्यास जागतिक क्रीडा स्पर्धेत लोकसंख्येच्या तुलनेत यशाचे प्रमाण वाढेल!’
       वक्ते विश्वास सोहनी म्हणाले, ‘चीन, जपान या देशात  मुलांना बालपणातच पोहणे शिकविले जाते. जागतिक स्पर्धेसाठी प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. आम्ही शाळेत मुलांना सहज प्रश्न विचारले, ‘मोठे झाल्यावर तुम्हाला काय व्हायचे आहे?’ यावर मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील होणार इति उत्तरे दिली. ‘मी भविष्यात राष्ट्रीय खेळाडू बनेल. आपल्या देशाचे नाव जगभर करेल असे वक्तव्य विद्यार्थ्यांनी केले नाही. त्याला आपल्या देशाची सामाजिक स्थिती थोडी कारणीभूत असू शकते. परंतु अशी जिद्द, चिकाटी, योग्य दिशा अन् मार्गदर्शन मुलांनी बालपणापासून घेतले तर उद्या आपल्या देशात जागतिक स्पर्धेत सोनेरी पदक मिळविणारे तरुण निर्माण होतील. आपल्याकडे थोडे आहे पण अजून थोडी मेहनत घेतली तर निश्चित उद्या बदल घडतील!’
       अरूण पवार यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, ‘उद्याच्या तरुण पिढीसाठी, राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याच्या दृष्टीने परिसंवादाच्या माध्यमातून चिंतन होत आहे याचा आनंद वाटतो.’
       महेश बोरोले यांनी प्रास्ताविक केले. संजय चव्हाण यांनी आभार मानले. लक्ष्मण शिंदे, विकास कोरे, पांडुरंग दोडके, बाळासाहेब साळुंखे, वैशाली चौधरी, मुरलीधर दळवी, संजय भंगाळे, रवींद्र पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
   क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक नटराज जगताप यांना पिंपरी चिंचवड शहरातील सर्व साहित्यिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

error: Content is protected !!