पिंपरी : पिंपरी न्यायालयाचा ३६ वा वर्धापन दिन आणि महिला दिनाचा सोहळा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे पार पडला. दिनांक ८ मार्च १९८९ रोजी पिंपरी – चिंचवडमध्ये पहिले न्यायालय सुरू झाले. एक न्यायालय ते आज सुसज्ज अशा नेहरूनगर येथील इमारतीमध्ये सुरू असलेले एकूण दहा दिवाणी फौजदारी न्यायालय यामागे मोठा संघर्ष पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वकिलांनी केलेला आहे. या मागील ३६ वर्षांतील सर्वच आठवणींनी यावेळी उजाळा देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले, पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमातीचे सदस्य सचिव ॲड. गोरक्षनाथ लोखंडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बालकलाकार कु. आकांक्षा पिंगळे, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर तसेच पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे सर्व माजी अध्यक्ष, पदाधिकारी व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वर्धापन दिनानिमित्त पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने दिनांक २७ मार्च ते ०४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. पिंपरी – चिंचवड शहरातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बालकलाकार कु. आकांक्षा पिंगळे त्याचबरोबर पिंपरी न्यायालयात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. क्रांती दीपाली दयानंद कुरळे यांच्या यशामागील संघर्षाबद्दल विशेष सन्मान यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या हस्ते करण्यात आला.

भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे या सदर कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी फोनद्वारे दिलगिरी व्यक्त करत वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व वकिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेवर असलेले रामायण, महाभारत आणि गौतम बुद्ध यांची चित्रे आपल्यातील समानता अधोरेखित करतात, त्याचबरोबर महिला दिनानिमित्त देशात कोसळत चाललेली विवाह संस्था यामधील महिलांचे घर बांधून ठेवण्यासाठीचे प्रयत्न, भारतात रुजत चाललेली लिव्ह- इन- रिलेशनशिप संस्कृती, महिलांच्या हक्काच्या दिशेने घडलेल्या घडामोडी आणि महिला दिनाची झालेली सुरुवात, त्याचबरोबर महिलांच्या विविध प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महिलांच्या हक्क अबाधित राहावेत यासाठी दिलेले निकाल यावर न्यायमूर्तींनी भाष्य केले.
पिंपरी न्यायालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आलेले होते. यावेळी ‘ती होती… ती आहे आणि ती राहणार…’ या मंत्रमुग्ध करणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या नृत्याचे विशेष सादरीकरण डान्सिंग एंजल या डान्स ग्रुपद्वारे प्रमुख पाहुण्यांसमोर करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वकील बांधव त्याचप्रमाणे शहरातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम, सहसचिव ॲड. राकेश जैद, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, ऑडिटर ॲड. शंकर घंगाळे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. मानसी उदासी, ॲड. सीमा शर्मा, ॲड. विकास शर्मा, ॲड. संघर्ष सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारचे माजी अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ यांनी केले; तर आभार सचिव ॲड. उमेश खंदारे मानले.

error: Content is protected !!