
पिंपरी :आजची स्त्री ही कार्यक्षम आहे, मग ती नोकरी करणारी असो, स्वतःचा व्यवसाय करणारी असो किंवा गृहिणी असो ..प्रत्येक स्त्री ने विविध स्तरांवर स्वतःला सिद्ध केले आहे, डार्विनच्या सिद्धांतानुसार निसर्गानेच स्त्रियांचं अस्तित्व मान्य केलं आहे. असे मतडॉ. संगिता अहिवळे यांनी केले.
स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर, पुणे व रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे 17. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी निमंत्रित कवयित्रींचे कवीसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
विज्ञानामध्ये डार्विन नावाचा एक खूप महान शास्त्रज्ञ होवून गेला. त्याने मांडलेला “नैसर्गिक निवडीचा सिद्धांत” सर्व श्रुत आहे. त्या सिद्धांतानुसार जे सजीव त्यांच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतात, तेच सजीव पुढील काळात जगतात, टिकतात. फार पूर्वी पासून स्त्रियांच्या वाट्याला विविध प्रकारचा संघर्ष आलेला आहे. त्यांच्या वर अन्याय,अत्याचार होत आलेला आहे.
परंतू न डगमगता स्त्रियांनी आपला प्रवास चालू ठेवलाय व स्वतःला सिद्ध ही केलंय . डार्विन च्या सिद्धांतानुसार, निसर्ग देखील स्त्रियांच्या समोर नतमस्तक झाला आहे असे मला वाटते असेही अहिवळे म्हणाल्या.
कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या प्राचार्य डॉ. संगीताताई अहिवळे होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा, सविता इंगळे, महिला मंच समिती चेअरमन स्वप्ना हजारे, कला विद्या शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कामयानी सुर्वे, स्वयंसिद्धाचे उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे, कार्याध्यक्ष – दिनेश भोसले, डॉ. निलकंठ डहाळे, पांडुरंग लोहटे, इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी डॉ. संगिता अहिवळे उपस्थित महिलांना उद्देशून बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, स्त्री काल पण श्रेष्ठ होती आणि आज ही श्रेष्ठ आहे. पूर्वी स्त्रियांचे अस्तित्व हे चूल आणि मूल या पुरते सिमीत होते आणि ती असंख्य रुढी परंपरेमध्ये गुरफटलेली होती, असे असले तरी राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी या सारख्या कितीतरी स्त्रियांनी त्या काळात सुद्धा बंधनाना न जुमानता स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आणि आपण इतर स्त्रियां पेक्षा वेगळ्या आहोत हे दाखवून दिले.
प्राचार्य डॉ. पांडुरण भोसले आपल्या मनोगतमधे म्हणाले की, आपला पुरुष समाज वर्ग महिलांना पूज्य मानतो. पूज्यचा अर्थ शून्य असा देखील होतो. ज्या दिवशी या पूज्यचा अर्थ पूजनीय असा होईल त्या दिवशी महिलांना खऱ्या अर्थाने सन्मान मिळेल. असे सांगून उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी आपल्या प्रस्ताविकातून संस्थेची माहिती सांगितली व आज महिला दिनाला उत्सवाचे, सणाचे स्वरूप आले आहे. तसे न होता महिला दिनाचा खरा इतिहास समजून घेऊन स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करावे. लेखणीतून महिलांच्या वास्तव परिस्थितीवर लिहिते व्हावे असे आवाहन केले.
यावेळी निमंत्रित कवयित्रींच्या कवीसंमेलनामध्ये, चंचल काळे यांनी “उमगत आहे पाणवठ्यावर रमती का बाया” “दुःख ओतुनी आनंदाला भरती या बाया”.
सुनीती लिमये यांनी, “सुपरवुमन सुपरवुमन सुपरवुमन लढते आहे.घर-दार पाठी बांधून पोटासाठी पळते आहे”
चिन्मयी चिटणीस यांनी “तिला आज मिक्सरचा आवाज
जास्त हवाय कदाचित् आपल्या आतले आवाज वर्षानूवर्षे ऐकणं, तिला सहन होत नसावं…” प्रज्ञा भारस्वाडकर यांनी,
“नाही राधा अन मीरा आम्ही सामान्य महिला नारीशक्ती प्रलोभना भुललेल्या दिनबाला” एकता कारेगावकर यांनी “बायको असते का हो फक्त स्वयंपाक करणारं एक यंत्र”
शोभा जोशी यांनी “आभाळ समद भरून आले बाहेर नको जाऊसं” माधुरी विधाटे यांनी “कंठी रुतलेले उमलू दे, मंजुळसे गाणे अवखळ या वाऱ्यावरती, लहरू दे तराणे मनमोकळा श्वास सखे, घेऊन बघ ना जरा नवस्वप्नांचे पंख निळे, लावून उड ना जरा” रजनी आहेरराव यांनी, “आनंदाची गुढी घेउन, आलीया घरी आकांक्षाच्या बागेतली, जणू सोनपरी !!”
धनश्री गणात्रा यांनी, “खूप खूप दुरून ताऱ्यांच्या देशातून
आले आहे मी तुमच्या घरी, आई-बाबा तुमच्या स्वप्नातली मी परी येऊ द्या ना जगात मला तुमच्यासाठी होऊ द्या ना मला तुमची लाडकी बेटी”
वृषाली वजरिनकर यांनी, “असंख्य क्षण हे तिचे गॅस ओट्याजवळ व्यतीत होतात, मनातल्या काहूरांना विझवायला ओट्यावरची भांडीही तिला आपलंसं करतात..” सीमा गांधी यांनी, “ती वडाच्या पारंब्यासारखी त्याच्या मनात विस्तारत जाते, चाफा होऊन दरवळत राहते,याचा थांगपत्ताही नसतो त्याला” रेवती साळुंखे यांनी, कालच्या रूढी विधीचे झेलते मी वार आहे संयमाच्या दागिन्याचा पण शृंगार … अशा स्त्रियांच्या विश्वातील त्यांच्या जाणिवांच्या, स्त्री व्यक्तिरेखा, स्त्री समस्या, स्त्री कर्तृत्वावरच्या कविता कवयित्रींनी सादर केल्या.
त्याचबरोबर, मृणाल जैन, वैजयंती आपटे, जयश्री श्रीखंडे, याणि अशा एकूण 20 कवयित्रींनी कविता सादर केल्या. या कार्यक्रमाच्या संयोजनात डॉक्टर कामयानी सुर्वे, श्री नंदकुमार मुरडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाला, महाविद्यालया तर्फे डॉ. प्रतिभा कदम, डॉक्टर सोनल बावकर, प्रा. सुषमा चत्त्तर, डो. मारुती केकाणे असे तर साहित्य क्षेत्रातील पुरुषोत्तम सदाफुले, सुरेश कंक, महेंद्र भारती, धनंजय भिसे, या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी, व कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन मृणाल जैन यांनी केले. आभार, प्रा. स्वप्ना हजारे यांनी मानले.
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
- नूतन अभियांत्रिकीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
- बजरंग बलीचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न : सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” दुर्गसेवकांचा उपक्रम
- रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद , खेळ पैठणी कार्यक्रमांमध्ये शेकडोच्या संख्येने सहभाग

