पिंपरी :ग्रामसंस्कृती तील  एक महत्त्वाचा घटक असलेल्या लोहाराचा महिमा कथन करणारे कविसंमेलन चक्क लोहाराचा भाता हलवित त्याच्या प्रज्वलित भट्टीच्या साक्षीने  झाले.
बालाजी फॅब्रिकेशन, डांगे चौक, थेरगाव येथे  अतिशय रंगतदार असे हे संमेलन झाले. शब्दधन काव्यमंच आयोजित “लोहार रे आळवितो…” या शीर्षकांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान ह. भ. प. बब्रुवाहनमहाराज वाघ यांनी भूषविले; तर हिंदी – मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक जितेंद्र रॉय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लोहारकामातील ऐरण, भट्टी, भाता, घण या सामुग्रीचे विधिवत पूजन करून तसेच शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांनी गायलेल्या “लोहार रे आळवितो…” या स्वरचित भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणार्‍या शब्दधन काव्यमंचाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जितेंद्र रॉय यांनी, ‘पुरातन काळात काश्मीर प्रांतावर राज्य करणारी लोहार ही जमात शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे!’ असे गौरवोद्गार काढले; तर बब्रुवाहन वाघ यांनी, “लोहार हे भगवान विश्वकर्मा यांचे वंशज आहेत!” असे मत अध्यक्षीय मनोगतातून मांडले. याप्रसंगी पारंपरिक लोहारकाम करणार्‍या विलास सोपान चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सुप्रिया लिमये यांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या गीताने कविसंमेलनाची सुरवात झाली. राधाबाई वाघमारे, आय. के. शेख, शोभा जोशी, अंबादास रोडे, जयश्री गुमास्ते, तानाजी एकोंडे, योगिता कोठेकर, बाळकृष्ण अमृतकर, सीमा गांधी, कैलास भैरट, फुलवती जगताप, सूर्यकांत भोसले, जयश्री श्रीखंडे, अरुण कांबळे, सविता इंगळे, मयूरेश देशपांडे, कल्पना बंब, सुभाष चटणे, नामदेव हुले, अशोक होनराव, हिंदी कवी मेजर अशोक जाधव, अविनाश लाड या कवींनी वैविध्यपूर्ण कवितांच्या माध्यमातून लोहार जमातीचे पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक योगदान अधोरेखित केले. ॲड. अंतरा देशपांडे यांनी सुमारे पंचवीस वर्षांपासून शब्दधनच्या साहित्यिक उपक्रमांची साक्षीदार असल्याची भावना व्यक्त केली. मुरलीधर दळवी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. अण्णा गुरव यांनी आभार मानले.

error: Content is protected !!