पवनानगर:  मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्र. २ मध्ये पवनानगरच्या पवना विद्या मंदिराने प्रथम क्रमांक पटकावला.लोकसहभागातून उभे राहिलेले पवना विद्या मंदीर कौतुकास पात्र ठरले आहे.
टप्पा क्रमांक दोनचा  तालुकास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे.माध्यमिक विभागात पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेने प्रथम व शासकिय शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणे या शाळेने प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.
वाळुंज म्हणाले,” मागील वर्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम सुरू झाला.त्यात मावळ तालुक्यातील अनेक शासकीय व खासगी शाळांनी सहभाग घेतला. दोन्ही गटांत प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे तीन लाख रुपये, दोन लाख रुपये व एक लाख रुपये अशी बक्षीसे मिळाली होती. यावर्षी त्याच स्पर्धेचा टप्पा क्र. दोनसाठी शासकीय व खासगी गटात मोठ्या प्रमाणावर तयारी करून शाळांनी सहभाग घेतला होता.
अनेक उपक्रमही राबविण्यात आले. या दोन्ही गटांतील शाळांची विशेष तपासणी पथ‌कामार्फत निकषनिहाय तपासणी करण्यात आली. निकाल संकलन करून शासकीय गटातून तीन व खासगी गटातून तीन अशा सहा शाळा निवडल्या गेल्या. प्रत्येक शाळेत निकषनिहाय राबविण्यात आलेले उपक्रम, रेकॉर्ड रजिस्टर याची तपासणी झाली.
परसबाग, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, शालेय पोषण आहार आदी सर्व बाबींची सखोल पाहणी व तपासणी करून तालुकास्तरावरून शासकीय व खासगी गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय अशा प्रत्येकी तीन शाळांची निवड करून निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यात क्रमांक मिळविलेल्या शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तपासणी होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.
विजेत्या शाळा पुढीलप्रमाणे :
खासगी शाळा : प्रथम- पवना विद्यामंदिर पवनानगर,
द्वितीय- एकवीरा विद्यामंदिर कार्ला,
तृतीय- ग्राम प्रबोधिनी विद्यालय साळुंब्रे.

*शासकीय शाळा* : प्रथम- जिल्हा परिषद शाळा धामणे,
द्वितीय- जिल्हा परिषद शाळा सांगवडे,
तृतीय- संत ज्ञानेश्वर विद्यालय, तळेगाव दाभाडे.
पवना विद्या मंदीर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब आगळमे म्हणाले, ‘ ग्रामीण भागातील सुमारे तीस ते पस्तीस गावातील विद्यार्थ आमच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेतात.शैक्षणिक वातावरणासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. लोकसहभागातून  इमारतीची दुरूस्ती आणि उभारणी, क्रीडांगण, सभामंडप अशी भरीव कामे झाली.स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता केली. बक्षिसाची रक्कम विधायक कामाला वापरणार आहे.

error: Content is protected !!