वडगाव मावळ: मोरया प्रतिष्ठानच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहरातील तब्बल दीड हजार मुले, पालक आणि नागरिक यांना रायगडाची सफर घडवून आणली.

वडगाव कातवीमधील मुलांसाठी सुरू केलेल्या सफर गड दुर्गांची या उपक्रमांतर्गत रायगड किल्ल्यावर आयोजित केलेल्या सफर मध्ये लहान मुलांसह त्यांचे पालक, नागरिक आणि प्रातिष्ठानचे सदस्य असे सुमारे दीड हजार जणांनी सहभाग घेतला होता. आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास व स्वराज्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर गड दुर्गांशिवाय पर्याय नाही.

या उदेशाने माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मोरया महिला प्रातिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या संकल्पनेतून प्रतिष्ठानने शहरातील मुलांसाठी प्रत्येक महिन्याला एक गडदुर्ग पाहण्याची सफर गडदुर्गांची ही मोहीम सुरू केली आहे. आत्तापर्यंत शिवनेरी, रायरेश्वर, तोरणा, सिंहगड, तिकोना, पुरंदर, राजगड अधिक किल्ल्यांवर या सहली देण्यात आल्या.
रायगड किल्ल्यावर नेण्यात आलेल्या सहलीत तब्बल दीड हजार जणांनी सहभाग घेतला प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्यासाठी नाष्टा, जेवून, पाणी आणि बसची व्यवस्था करण्यात आली होती. गडाच्या पायथ्याशी पोहचल्यावर इतिहास अभ्यासक सत्यजित भोसले यांनी गडाचा इतिहास व गडावरील ऐतिहासिक वास्तूंची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण गड चढून होळीच्या माळावर पोहोचले. त्यानंतर नगारखान्यातून आतमध्ये गेल्यावर सर्वांना गडाची माहिती व आवश्यक सूचना देण्यात आल्या.

माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना महाकुंभाच्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी बाजारपेठ, टकमक टोक, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी यांचे दर्शन घेतले. संध्याकाळी गड उतार झाल्यानंतर सर्वांनी पाचाड येथे असलेल्या जिजाऊ साहेबांच्या समाधिस्थळी दर्शन घेतले. संध्याकाळी गडाच्या पायथ्याला स्नेहभोजन करून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले व रात्री उशिरा घरी पोहोचले.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. ही मोहीम केवळ गडभेट नव्हती, तर इतिहास, परंपरा आणि संस्कृतीच्या जतनासाठी केलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल होते, अशी भावना शिवप्रेमी गणेश जाधव, सचिन ढोरे यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!