
पिंपरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ठीक ०६:३० वाजता ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा २०२५ आयोजित केला आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरि शंकर जैन आणि विधिज्ञ ॲड. विष्णु शंकर जैन या पितापुत्रांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान करून गौरविण्यात येईल; तसेच हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या मीरा अ. कडबे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे हे सतरावे वर्ष असून हिंदुत्व आणि हिंदू धर्मासाठी अनेक वर्षांपासून कायदेशीर संघर्ष करणारे ॲड. हरि शंकर जैन आणि ॲड. विष्णु शंकर जैन या पितापुत्रांना रुपये एक लक्ष आणि सन्मानचिन्ह प्रदान करून राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे; तर विदर्भ प्रांतात लव्ह जिहाद, कौटुंबिक हिंसाचार, नारी सुरक्षितता यासाठी सुमारे चौतीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या मीरा अ. कडबे यांना रुपये एकावन्न हजार आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे.
या गौरव सोहळ्याला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर यांनी केले आहे.
- लोहाराचा भाता हलवित रंगले कविसंमेलन: शब्दधन काव्यमंचचा अनोखा उपक्रम
- लक्ष्मीबाई हरिभाऊ दाभाडे पाटील यांचे निधन
- ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल सरपंचपदासाठी २७ला आरक्षण सोडत
- फॅशन फ्युजन फेस्टिवल सिझन
- पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी संतोष भेगडे


