


वडगाव मावळ: श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे जन्म गाव असलेल्या साते गावात अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा उत्साहात झाला.सन १९७६ साली येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला.
अखंड हरीनाम सप्ताहाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्या निमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.इवलेंसें रोप लाविलें द्वारीं । त्याचा वेल गेला गगनावरी या अभंगाप्रमाणे दिवसागणिक सोहळ्याची श्रीमंती वाढत गेली.काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, महिला भजन, संगीत तुलसी रामायण कथा, पंचक्रोशीतील गावातील हरी जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
रामायणार्य ह. भ. प. संजय महाराज पाचपोर यांच्या मधुर वाणीतून संगीत तुलसी रामायण कथेचे श्रवण समस्त ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी केले. ग्रंथ महात्म्य व शिव पार्वती सोहळा, श्री राम जन्म, अहिल्याउध्दार व सीता स्वयंवर, श्री राम वनवास व केवट कथा, भरतभेट व सीताहरण, वाली वध व लंका दहन, रावण दहन व प्रभु श्री राम राज्याभिषेक सोहळा असे रोज विविध कथा श्रवणाचे भाग्य लाभले.
कथा झाल्यावर रोज पै पाहूणे आणि पंगतदार व ग्रामस्थांच्या हस्ते श्रीआरती होत होती. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने ज्ञानेश्वरी पारायण करण्यासाठीं ५० पेक्षा जास्त भाविकांनी पारायण केले. गावातील सर्व मंदिरे विद्युत रोषणाईने झळकली होती.रथ सप्तमी ची दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला .त्याच दिवशी प्रभु श्रीराम यांचा राज्याभिषेक सोहळा विवीध लहान मुलांनी केलेल्या वेशभूषा मुळे अजून आनंदी झाला श्री राम, सीता माता, बंधू लक्ष्मण आणि भरत, भक्त श्री हनुमान आणि शबरी अशी विवीध पात्र मुलांनी सादर केली.
ग्रामस्थांनी रोज येणाऱ्या भाविकांची व्यवस्था केली होती. वाहनतळ, शौचालय , पाणी व्यवस्था, कथा श्रवण साठी स्वतंत्र महीला आणि पुरूष बैठक व्यवस्था , स्वयंपाक गृह, भोजन साठी वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला होता. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भगवी पताका लावण्यात आली तसेच कथा मंडप मध्ये रामायणातील विविध कथा प्रसंगाचे फलक लावण्यात आले होते.
कथा नुसार लहान मुलांची वेशभूषा केली जायची. ग्रामस्थांनी रोज १६०० ते १८०० माणसांचे जेवणाची व्यवस्था केली होती. गावातील सर्व युवक , युवती, महिला, लहान मुले असे १०० ते १२५ जणांनी जेवण वाढण्याचे काम केले. सप्ताह काळात रोजची रोज संध्याकाळी साफसफाई केली जायची, कोठेही प्लास्टिक वापरले नाही त्या निमित्त स्वछतेचा संदेश गावकऱ्यांनी दिला, प्रत्येक जण मिळेल ते काम कोणीही न सांगता स्वतः करत होता. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विवीध मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी देणगी स्वरुपात मदत केली.
सप्ताहाचे शेवटी ह . भ . प. अशोक महाराज पांचाळ यांच्या वाणीतून काल्याचे कीर्तनाने झाले. उपजोनियां पुढती येऊं ॥ काला खाऊं दही भात ॥ वैकुंठी तो ऐसें नाही ॥ कवळ कांही काल्याचें ॥ टाळ- वीणा , मृदुंग गजरात ग्रंथदिंडी ची ग्रामप्रदक्षिणा झाली. दिंडी चे स्वागत पुष्प वृष्टी करत झाले, संपुर्ण गावात महिलांनी दुतर्फा सडा-रांगोळी काढली होती. महिलांनी फेर धरत, फुगडी घालत आनंद व्यक्त केला, सर्व अबाल वृद्ध दिंडी मध्ये सामील झाले होते.
शेवटच्या दिवशीही महाप्रसाद चे आयोजन केले होते. आठ दिवस गावातील वातावरण भक्तिमय झाले होते, सर्वांनी या उत्सवाचा आनंद घेतला. मोठ्या उत्साहात अखंड हरीनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्ष साते येथे साजरे झाले.
- मावळ तालुक्याच्या विकास कामांसंदर्भात आमदार सुनील शेळके यांची पीएमआरडीए आयुक्तांसोबत बैठक
- वणवे व वन्यप्राण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती :वनविभाग शिरोता व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचा पुढाकार
- भामाबाई महादू सातकर यांचे निधन
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


