पिंपरी: ‘धार्मिक ऐक्य हेच संस्कृतीचे वैभव असते!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे येथे व्यक्त केले.
पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी आयोजित वार्षिक शब्दोत्सव उपक्रमांतर्गत ‘समग्र बाबा भारती’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ बौद्ध विचारवंत प्रा. दि. वा. बागूल अध्यक्षस्थानी होते; तर प्रा. डॉ. प्रकाश पगारिया, रजनी कानडे, अनिल सोनवणे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आणि बाबा भारती प्रतिष्ठान – पिंपरीचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘कोणताही धर्म कधीही क्रूर नसतो; परंतु त्याचा विकृत आणि द्वेषमूलक अन्वयार्थ लावणारे संकुचित विचारांचे असतात. कोणत्याही एका धर्मापेक्षा सर्व धर्मांचे संचित हे समाजासाठी कल्याणकारी आहे. विश्वकल्याणासाठी सर्व धर्मांमध्ये सुसंवाद महत्त्वाचा आहे अन् हेच तत्त्व संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब यांनी अधोरेखित केले आहे.
बाबा भारती यांनी उदारमतवाद आणि मूल्यविवेक बाळगून, सर्व धर्मातील चांगुलपण स्वीकारून नेहमीच जगण्याचा अन् वागण्याचा प्रयत्न केला!’ प्रा. डॉ. अशोक पगारिया यांनी, ‘सामाजिक काम करणारी माणसे समाजात खूप कमी असतात; मात्र त्यांच्या कार्याची दखल घेण्याचे कार्य लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जात आहे. महेंद्र भारती यांची ही आपल्या वडिलांप्रति खऱ्या अर्थाने आदरांजलीच आहे!’ असे गौरवोद्गार काढले.
प्रा. दि. वा. बागूल यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘श्रमण संस्कृती विरुद्ध ब्राह्मण संस्कृती अथवा समता विरुद्ध विषमता हा संघर्ष पाच हजार वर्षांपासून सुरू आहे. बाबा भारती यांनी आपल्या स्वतःच्या आकलनातून धम्मपदांमधून बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार अन् प्रसार केला. मला स्वतःला त्यांच्या पाली शब्दकोशाचा वेळोवेळी उपयोग झाला आहे!’ असे मत मांडले.
प्रकाशनानंतर प्रतिष्ठानच्या वतीने अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. भीम गायकवाड यांना लोकशिक्षक बाबा भारती आरोग्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक बाबा कांबळे, सेवानिवृत्त नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी
आनंदा कांबळे, नाट्य – चित्र कला अकादमी अध्यक्ष सूर्यकांत तिवडे, सेवायात्री रमेश ढाले, राजारामबापू सहकारी साखर कारखाना संचालक राजकुमार कांबळे, अभिनीहार बुद्धविहार अध्यक्ष प्रकाश परांजपे, अभिनीहार बुद्धविहार संचालक भाऊसाहेब कांबळे, अभिनीहार बुद्धविहार संचालक सचिन कांबळे, क्रियाशील कार्यकर्ते विजय कांबळे, एस. टी. महामंडळ कर्मचारीनेते सुरेश देशमुख आणि प्रकाश कांबळे, मुंबई सत्र न्यायालय अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सतीश केकनीस यांना लोकशिक्षक बाबा भारती विशेष गौरव सन्मान प्रदान करून; तसेच मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधीक्षक शंकर कांबळे यांना लोकशिक्षक
बाबा भारती पदोन्नती गौरव सन्मान आणि जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्था महाव्यवस्थापक विक्रांत कांबळे यांना लोकशिक्षक बाबा भारती सहकार गौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रातिनिधिक पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

डॉ. भीम गायकवाड यांनी सुरेल आवाजात गायलेल्या “निळ्या नभीचा चंद्रमा…” या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविक केले. अरुण गराडे, रवींद्र भारती, राजेंद्र वाघ, निमिष भारती, जयवंत भोसले, प्रा. प्रभाकर दाभाडे, प्रतिमा काळे यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!