मावळ माझाचे संपादक विशाल विकारी यांना राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान

लोणावळा : लोणावळा येथील मावळ माझा न्युज चे संस्थापक संपादक व लोणावळा शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विशाल यशवंत विकारी यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, पिंपरी चिंचवड पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त 6 जानेवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे.
ABP माझा च्या संपादिका सरिता कौशिक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे, अभिनेते किरण माने, दैनिक लोकमतचे सोलापूर संपादक सचिन जवळकोटे, पद्मभूषण डॉक्टर गिरीश प्रभुणे, माजी आमदार विलास लांडे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे, कामगार नेते यशवंत भोसले, इरफान भाई सय्यद, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अतुल क्षीरसागर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चपळगावकर यांच्यासह अनेक मान्यवर या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते.
विशाल विकारी यांनी 2003 साली साप्ताहिक इंद्रायणी वार्ताच्या माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. 2005 सालापासून दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्रातून त्यांच्या दैनिक वृत्तपत्र पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुढील काळामध्ये दैनिक लोकमतचे सलग चौदा वर्ष वार्ताहर म्हणून त्यांनी काम केले. सोबतच दैनिक तरुण भारत, दैनिक सकाळ, दैनिक प्रभात, दैनिक भास्कर, यामध्ये देखील त्यांनी काही काळ कामे केली आहेत. 2008 साली सुरू झालेल्या पहिल्या डिजिटल पोर्टल एमपीएससी न्यूज चे कामकाज त्यांनी सांभाळले. अनेक टिव्ही चॅनल मध्ये त्यांनी बातम्या दिल्या आहेत. 2019 साली कोरोना काळामध्ये सर्व जग थांबले, वृत्तपत्र बंद झाली असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी ह्या नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मावळ माझा न्युज या लोणावळा शहरातील पहिल्या डिजिटल न्युज पोर्टलची स्थापना केली. आज मावळ तालुक्यातील अग्रगण्य डिजिटल न्युज पोर्टल म्हणून मावळ माझा न्युजची ओळख आहे.
मागील 21 वर्ष लोणावळा शहर व मावळ तालुक्यामध्ये पत्रकारिता करत असताना त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, गुन्हेगारी, कला व क्रीडा या विविध विषयांवर परखडपणे लिखाण केले. अनेक निर्णय घेण्यास प्रशासनाला व राजकारणांना भाग पाडले. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी सध्या ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या उपाययोजना होण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण लिखाण केले. लोणावळा शहर व मावळ तालुका हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून नवनवीन प्रकल्प यावेत याकरिता पाठपुरावा केला. स्थानिक नागरिकांचे प्रश्न सातत्याने मांडत प्रशासनाकडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. या आदिवासी समाजाला जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी सातत्याने लिखाण करत त्यांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मावळातील जमीन व्यवहार प्रकरणावर मालिका लिखाण केले. त्याची दखल घेत दुय्यम निबंध कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करताना आधार लिंक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लोणावळा ते तुळापूर वाहणाऱ्या इंद्रायणी नदीची दुरावस्था ही मालिका प्रसारित करण्यामध्ये महत्त्वाचा पुढाकार घेत इंद्रायणीची झालेली अवस्था शासनासमोर मांडत इंद्रायणी नदी सुशोभीकरणाच्या कामाचा डी पी आर तयार होण्यासाठी सातत्यपूर्ण लिखाण व पाठपुरावा केला. कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी वारंवार वार्तापत्र प्रसिद्ध केली. अशा विविध प्रकारच्या अभ्यासपूर्ण व सातत्यपूर्ण लिखाणामुळे व त्यामधून झालेल्या सकारात्मक बदलाची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्यावतीने विशाल विकारी यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एबीपी माझाच्या प्रतिनिधी अश्विनी सातव यांनी केले.
या कार्यक्रमाच्या दरम्यान महाराष्ट्र माध्यमांची दशा व दिशा या विषयावर परिसंवाद पार पडला. अभिनेते किरण माने यांनी जनतेच्या मनातील प्रश्न विविध वृत्तपत्रांचे व वृत्तवाहिन्यांच्या संपादक यांच्यासमोर उपस्थित करत त्यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरे मिळवली.

error: Content is protected !!