पिंपरी :  “संगीत आणि कोणत्याही कलेची साधना जीवनाला अर्थपूर्ण बनवते!” असे विचार सुप्रसिद्ध कवी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी थिआ बिझनेस पार्क, ईला, काटेवस्ती, पुनावळे येथे व्यक्त केले. स्वरोपासना ग्लोबल म्युझिक ॲकॅडमीच्या पुनावळे शाखेचे उद्घाटन करताना
राजन लाखे बोलत होते. अभियंता सुधीर कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखासदस्य किरण जोशी, मोहन कस्पटे, भाग्यश्री कुलकर्णी, प्रतीक पवार, अमोल सावंत, विद्या धोंडरकर, स्वरोपासना ग्लोबल म्युझिक ॲकॅडमीचे संचालक अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजन लाखे पुढे म्हणाले की, “संगीत ही वैश्विक भाषा आहे. पिंपरी – चिंचवड सारख्या उद्योगनगरीत   संगीत साधनेसाठी स्वरोपासना ॲकॅडमीच्या माध्यमातून एक सुसज्ज दालन उपलब्ध झाले आहे; तसेच सुमारे दहा देशातील विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने संगीत शिक्षण घेत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे!” लाखे यांनी आपल्या मनोगताचा समारोप करताना स्वरचित शारदास्तवन सादर केले.
सुधीर कुलकर्णी यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतातून, “स्वरोपासनाच्या वाकड आणि कस्पटेवस्ती या दोन शाखांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बालश्री, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, झी सारेगमप लिटिल चॅम्प असे नामांकित पुरस्कार प्राप्त केले असल्याने या शाखेतील विद्यार्थ्यांनीसुद्धा असाच नावलौकिक प्राप्त करावा!” अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या वतीने देवेंद्र जानी आणि पालकांच्या वतीने श्रद्धा पाटील यांनी नूतन शाखेला शुभेच्छा दिल्या.
अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून, स्वरोपासना ग्लोबल म्युझिक ॲकॅडमीच्या वाकड आणि कस्पटेवस्ती येथील शाखा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अधिकृत परीक्षाकेंद्र म्हणून मान्यताप्राप्त असून गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार गायन – वादन शिकवले जाते, अशी माहिती दिली.

स्वरदिंडीने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी आणि पालक यांनी सहभाग घेऊन सरस्वतीस्तवन, राग भूप, बागेश्री, भीमपलास यांच्या सरगमगीतांचे गायन केले. पंडित पलुस्कर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाग्यश्री कुलकर्णी यांनी स्वागत केले. अर्पिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व कुलकर्णी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!