तळेगाव : सुप्रसिद्ध साहित्यिक अॅड्. सहदेव मारुती मखामले यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला. शालेय जीवनापासूनच लेखनाची आवड असणारे अॅड्. मखामले यांनी कलापथक, लोकनाट्यातील वग, गाणी, काव्य, कथा, नाट्य, लेख, कादंबरी व स्फूट लेखन दमदारपणे केले. १९८० साली सुप्रसिध्द साहित्यिक कै. गो. नी. दाण्डेकर यांच्या सहकार्याने ‘साहित्य कला आणि संस्कृति मंडळाची’ स्थापना त्यांनी केली असून मंडळ नवोदित लेखकांसाठी आजपर्यंत कार्यरत आहे. अनेक लेखक, कवींना मार्गदर्शन करुन साहित्य क्षेत्रातील भरीव कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही न भरुन येणारी आहे.
त्यांनी १९७३ ते १९९३ रोहिणी, वहीनी, भालचंद्र, अनुराधा, अनुप्रिता, अनुराग, अस्मिता, अक्षयछाया, शब्दगंध इत्यादी ३० ते ४० मासिके दिवाळी अंकांमधून विपूल लेखन केले. त्यांचे तीन अंकी लोकनाट्य ‘गंगेत घोडं न्हालं’ १९७४ साली विशेष गाजले. कलापथक गीतसंग्रह (सिनेसंगितावर), ललाटीचा लेख (कथासंग्रह), उंबराचं फुल (मुक्तकाव्य), पत्रमैत्री (कथासंग्रह कादंबरी स्वरुपात), शंभरातले दोन शून्य (कथासंग्रह), वर्तुळ (कादंबरी), मुखवट्यांचा दिमाख (काव्यसंग्रह), सख्या (काव्यसंग्रह) भाग एक व दोन, तथास्तु (काव्यसंग्रह) इत्यादी साहित्य वाचकांना वेड लावून गेले. नुकतेच त्यांचे आत्मचरित्र ‘सदाफुली’ प्रकाशित झाले असून त्यास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
त्यांनी शिर्डी येथील राज्यस्तरीय स्पर्धा पारितोषिक वितरण व कवीसंमेलन १९८०, सांगली-वीटा येथील विभागीय साहित्य संमेलनामधील काव्यवाचन सत्र १९८२, साहित्य सुगंध मिरज
आयोजित ग्रामीण साहित्य संमेलनातील काव्यसंमेलन १९८३, कोकण मराठी साहित्य काव्यसंमेलन १९८४, डॉ. नामदेव ढसाळ स्मरणार्थ म. सा. प. राजगुरुनगर शाखेने आयोजित केलेल्या काव्यसंमेलन २०१७ इत्यादी संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले होते. कामगारक्षेत्रात भरीव काम करताना अॅड्. मखामले यांना कामगार नेते एस. एम. जोशी, ना.
ग. गोरे, डॉ. बाबा आढाव, नेते भाई वैद्य यांचा १९८४-८५ पासून सहवास लाभला आणि कामगार चळवळीत सक्रिय सहभागी होऊन विविध संघटनांचा राज्यस्तरीय पदाधिकारी म्हणून त्यांनी समर्थपणे धूरा सांभाळली.
त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यात प्रामुख्याने ग. दि. मा. काव्यलेखन पुरस्कार १९७८ ‘चैत्रबन’ पुरस्कार, ‘की’ क्लब मिरज यांचा दशकातले कवी पुरस्कार १९८०, शिर्डी शब्द झंकार पुरस्कार १९८१, सांगली विटा साहित्य सुंगध पुरस्कार १९८२, सातारा वसंत मेरुलिंगकर काव्य पुरस्कार १९८३, गोमंतक काव्य पुरस्कार १९८४, काव्यपंढरी पुरस्कार १९८५, महाराष्ट्र राज्यस्तरीय उत्कृष्ठ ग्रंथ/वाग्ङमय पुरस्कार २००२ (मुखवट्यांचा दिमाख काव्यसंग्रह), पुणे आकाशवाणीवरुन सूत्रसंचालन सन्मानपत्र २००६, प्रितीसंगम साहित्य मंच, कराड दशकातले कवी पुरस्कार १९९९ व २००९, साने गुरुजी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दि. २१ जून २०१५ असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार असून ते आपापल्या व्यवसायात कार्यरत आहेत.

error: Content is protected !!