वडगाव मावळ: गतवर्षी पासून पोलीस भरती साठी साते गावाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.. कारणही तसंच आहे.. समदी पोरं जिद्दीनं तयारी करू लागली.. ऊन वारा पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता सराव चालु ठेवला.. जिथं माणसं साखरझोपेत असायची तेव्हा मात्र ही मुले पहाटे मैदानावर असायची…  वर्दी मिळवायची हेच ध्येय उराशी बाळगून आज मावळ मधील साते गावातील बरीच मुले मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. फक्त पोलीस भरतीच नव्हे तर तलाठी, राज्य सेवा, पोलीस उप निरीक्षक, वन विभाग , महसूल विभाग अशा एक ना अनेक शासकीय भरती साठी मुले तयारी करत आहेत. बरीच मुले बँकिग क्षेत्रातही कार्यरत आहेत.
नुकताच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल या परीक्षेचा निकाल हाती आला अन् यात साते गावच्या यशाची परंपरा कायम ठेवत प्रतिक ने बाजी मारली.. संपुर्ण गावात त्याचे जल्लोषात स्वागत केले…नवनीत करीयर अकॅडमी आणि ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढली.. प्रतिकचे कुटुंबिय आणि नातलग, मित्र परीवार आनंदाने फुलून गेले…
प्रतिक ने स्वतः केलेल्या कष्टाचे बोल त्याच्याच शब्दात…
माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साते आणि माध्यमिक शिक्षण नानासाहेब बलकवडे विद्यालय साते या ठिकाणी झाले. जेव्हा मी पोलीस भरती करण्याचे ठरवले तेव्हा मी नवनीत करिअर अकॅडमी कामशेत येथे प्रवेश घेतला आणि माझ्या आयुष्याला नवे वळण आले. अकादमीचे संचालक  विकास साळवे  आणि शिक्षिका  पूजा साळवे  यांनी मोलाचे सहकार्य केले. खरंच आजच्या माझ्या या यशाचे श्रेय मी माझे आई वडील, माझे कुटुंबीय आणि माझ्या गुरूंना देऊ इच्छितो कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय माझ्यासाठी हे सगळं अशक्य होतं.
गेल्या वर्षी काही मार्क्स ने मी अपयशी ठरलो. परंतु माझे आई वडील,  माझे गुरु विकास साळवे  यांनी मला पाठिंबा दिला आणि मी पुन्हा जोमाने तयारीला लागलो. माझे वडील  शशिकांत  गायकवाड आणि आई रुपाली शशिकांत गायकवाड हे कामशेत या ठिकाणी एक खानावळ चालवतात मी ही त्यांना मदत करायचो  तेथे नेहमी समोर पोलीस बघून माझ्या मनातही देशसेवा जागृत झाली. पोलीस बनायची उमेद मिळाली अन् माझ्या या निर्णयाला माझ्या घरच्यांनीही पाठिंबा दिला.
गेल्या वर्षी जेव्हा मी पोलीस बनू शकलो नाही आणि माझ्या बरोबरीचे विद्यार्थी पोलीस भरती झाले त्यावेळी  आपल्याला यश नाही मिळालं नाही म्हणुन थोडंसं वाईट वाटले. परंतु आई वडील म्हणाले यश अपयश हा जीवनाचा एक भाग आहे आणि देव योग्य वेळी योग्य तेच देत असतो, त्यामुळे खचून जायचं नाही आणि त्याच वेळी मी माझं दुःख विसरून सगळ्यांच्या आनंदात सहभागी झालो अन् माझ्या उणीवा भरून काढल्या, कमतरतेवर भर दिला अन् आज यश प्राप्त झाले.. माझी बहीण मंजिरी शशिकांत गायकवाड हिनेही मला कशाची कमी पडू दिली नाही आज ती सुद्धा पोलीस भरती साठी तयारी करत आहे.
आणि माझे भाऊ श्रीकांत गायकवाड आणि आदित्य गायकवाड यांचेही मला वेळोवेळी सहकार्य लाभले. आता पुढे न थांबता पुढील शिक्षण चालु ठेवून पोलीस उपनिरीक्षक साठी तयारी करणार आहे. पोलीस भरती करणाऱ्या मुलांना एवढेच सांगेल की ध्येय प्राप्त करणे म्हणजेच सातत्याने अभ्यास, सराव अन् जिद्द मनाशी बाळगावी लागते मग यश आपल्या हातात आलेच म्हणून समजा.
वैभव शहाजी पोळ (अहिरवडे मावळ) या विद्यार्थ्याने सुध्दा राज्य राखीव पोलीस दल मध्ये बाजी मारली. सर्व कुटुंबीय, मित्र परीवार, अहिरवडे ग्रामस्थ आणि नवनीत करियर अकादमी च्या सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोषात मिरवणूक काढली..माझ्या मुलाच्या या यशाने आम्हीं सर्व भारावून गेलो आहोत. काबाड कष्ट केले पण मूलांना उच्च शिक्षित करून देश सेवा साठी पाठवत आहोत याचा मला अभिमान आहे. साते गावातील बरीच मुले आता अधिकारी होत आहे याचा आनंद वाटतो.- शशिकांत नाना गायकवाड (वडील)
मुलांनी आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत. साते गावातील हा आठवा मुलगा आहे जो पोलीस भरती होत आहे. प्रतिक आणि वैभव ने यासाठी खूप मेहनत घेतली. _ विकास साळवे (नवनीत अकॅडमी, कामशेत)
गावातील तरुण पिढीचे हे यश पाहून आम्हां गावकऱ्यांना खूप आनंद होत आहे. असेच आपल्या साते गावचे नाव उज्वल करा. अजुन भरपूर अधिकारी तयार होवोत हीच ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज चरणी प्रार्थना.. दशरथ रामचंद्र आगळमे (ग्रामस्थ)

error: Content is protected !!