पिंपरी:विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘ये शाम मस्तानी’ या दृकश्राव्य हिंदी चित्रपटगीतांच्या नि:शुल्क मैफलीत रसिकांनी एक अविस्मरणीय सुरेल संध्याकाळ अनुभवली. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह) येथे  सुमारे साडेतीन तास अभिजात हिंदी चित्रपटातील अजूनही ओठांवर खेळणारी आणि काही विस्मरणात गेलेली अवीट गोडीची गीते ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले.

 विनायक कदम, नंदकुमार कांबळे, सुजाता माळवे, राजेंद्र कांबळे,मालन गायकवाड, विकास जगताप, शुभांगी पवार, विलास खरे, संगीता पाटील, अनिल जंगम, सुहासिनी कंझरकर, मल्लिकार्जुन बनसोडे, स्वरदा शेट्ये, अरुण सरमाने, शैलेश घावटे या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील गीतांच्या सादरीकरणातून रसिकांना चित्रपटसृष्टीतील संगीताच्या सुवर्णकाळाची अनुभूती दिली.

 ‘जहांआरा’ पासून ‘तेजाब’पर्यंत, सुनील दत्तपासून अनिल कपूरपर्यंत, आशा पारेखपासून दिव्या भारतीपर्यंत, एस. डी. बर्मन पासून जतीन – ललितपर्यंत, साहिरपासून समीरपर्यंत, तलत मेहमूदपासून महंमद अझिजपर्यंत तसेच लतादीदींपासून अनुराधा पौडवालपर्यंत, “तुम अगर साथ देनेका वादा करो…” पासून “मैं तो रस्तेसे जा रहा था…” पर्यंत सुरेल संगीताचा विशालपट आणि पार्श्‍वभूमीवर संबंधित गीताचे पडद्यावर दृश्य यामुळे विविध वयोगटातील रसिक स्मृतिरंजनात रंगून गेले होते. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीचा समारोप महानायक अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील “मेरे अंगनेमें तुम्हारा क्या काम हैं…” या धमाल गीताने करण्यात आला.

 विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. शैलेश घावटे यांनी संगीत संयोजन केले. गणपत जठार, काशिनाथ ताटे आणि दीपाली नाईकनवरे यांनी चित्रीकरण  केले.

error: Content is protected !!