कार्ला परिसरात यात्रा काळात दोन दिवस दारुबंदी 

श्री एकविरादेवी यात्रेसाठी एकविरा देवस्थान व पोलिस  प्रशासन सज्ज 

आज पासून एकविरादेवी यात्रेला सुरवात

कार्ला : 

महाराष्ट्रातील कोळी व आगरी बांधवांचे कुलदैवत व  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या  कार्ला वेहरगाव येथील आई  एकवीरा देवीची चैत्री यात्रा  दिं १४  आजपासून सुरवात होत आहे.

 या काळात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी पोलिसांनी  कार्ला , वेहरगाव, वाकसई, मळवली, वरसोली परिसरात १५ व १६ एप्रिलला  दारूबंदी करत विविध उपाययोजना राबविल्या आहे.श्री एकवीरा देवी यात्रेसाठी पोलिस प्रशासन,एकविरादेवी देवस्थान विश्वस्त मंडळ, महसुल प्रशासन,वनविभाग,पुरातत्व विभाग व वेहरगाव ग्रामपंचायत प्रशासन   सज्ज झाले आहे.

      पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर अधिक्षक रमेश चोपडे यांंच्या मार्गदर्शनाखाली  लोणावळा उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक व  लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

 १४  ते  १६ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

 चैत्र शुध्द षष्टीला माहेरघरी (देवघर) १४ एप्रिल  रोजी संध्याकाळी आठ वाजता बहिरी देवाची पालखी सोहळा तर, १५  एप्रिल  रोजी चैत्र शुध्द सप्तमीला सायंकाळी सात वाजता मुख्य यात्रा म्हणजे श्री आई एकवीरादेवीचा पालखी सोहळा वाजत गाजत मांगल्यपूर्ण वातावरणात सुरू होणार आहे. 

१६ एप्रिलला  रोजी अष्टमीला रात्री ३ वाजता तेलवानाचा कार्यक्रम होणार आहे. एकविरा देवस्थानचे विश्वस्त नवनाथ देशमुख,मारुती देशमुख,संजय गोविलकर,विकास पडवळ, सागर देवकर, महेंद्र देशमुख,सरपंच व विश्वस्त वर्षा मावकर उपसरपंच शंकर बोरकर  पोलिस पाटील अनिल पडवळ  यांनी यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

यात्रा कालावधीत भावीकांची कोणतीही गैरसोयी होवून नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसचे कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता प्रशासनाकडून खालील प्रमाणे उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.

उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी, उपविभाग, पुणे यांचे कार्यालयाकडून फौ.प्र.सं. १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक १२/०४/२०२ रोजी ००:०० ते दि. १६/०४/२०२४ रोजी २४:०० वा. या कालावधीत मौजे वेहेरगाव व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी शोभेचे दारू व फटाके गडावर नेणे व वाजविणे, वादय वाजविणे, एकाच प्रकारची वेशभुषा (विशेषतः टी शर्ट परिधान करणे) पशु पक्षी यांचा बळी न देणे व त्यांना मंदीर परिसरात न सोडणे मंदीर परिसरात असलेले कार्ला लेणी, ऐतिहासिक वास्तु व शिल्पांना हानी न पोहचविणे किंवा त्याचे विद्रुपीकरण न करणे ई. प्रतिबंधात्मक आदेश काढलेले आहेत.

 जिल्हाधिकारी तथा राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे यांनी दिनांक १५ व १६ एप्रिल या कालावधित मौजे वेहेरगाव व परिसरातील इतर गावामध्ये सर्व प्रकारच्या मद्य विकी अनुज्ञप्ती बंद करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोा, पुणे यांनी दिनांक १४/०४/२०२४ रोजी ००:०० वा. ते दिनांक १६/०४/२०२४ रोजी २४:०० वा. या कालावधीत अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी केलेली असून मोठ्या वाहनांसाठी अग्रसेन पॅलेस (हॉटेल) पार्नंग, लाजवंती कॉलेज पार्किंग, दुर्गा परमेश्वरी पार्किंग ई. ठिकाणी भावीकांनी आपली अवजड वाहने पार्कंग करणेबाबत आदेश पारीत केलेले आहेत. 

तसेच दि. १५/०४/२०२४ रोजी ००:०० वा. ते २४:०० वा. या कालावधित जुना- पुणे मुंबई (एन.एच. ४८) या महामार्गावरील जड वाहतुक ही वडगाव फाटा ते कुसगाव (बु) टोलनाका दरम्यानची जड-अवजड वाहनांची वाहतुक बंद करून ती वडगाव फाटा ते पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरून कुसगाव (बु) टोलनाका अशी जातील व दि. १५/०४/२०२४ रोजी ००:०० वा ते २४:०० वा. या कालावधित जुना मुंबई-पुणे (एन.एच. ४८) या महामार्गावरील कुसगाव (बु) टोलनाका ते वडगाव फाटा या दरम्यानची जड-अवजड वाहनांची वाहतुक बंद करून ती नवीन मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून वडगाव फाटा अशी वळविण्यात आली आहे.

बाबत आदेश केलेले आहेत.पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत, वेहेरगाव यांचेकडून श्री. एकवीरा देवी मंदीर परिसर, कार्ला लेणी गड, गडावर जाण्या-येण्याकरीता असलेल्या पायऱ्या तसेच कार्ला फाटा ते वेहेरगाव यादरम्यान असलेले अतिक्रमण काढून भाविकांना येण्या-जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे.

भाविकांना वेळेत वैद्यकीय सुविधा श्री. एकविरा देवी गड, व ग्रिनफिल्ड चौक, या ठिकाणी वैद्यकिय पथके तैनात करण्यात आलेली आहेत. जागो जागी मोबाईल टॉयलेट बसविण्यात आलेली आहेत. गड व परिसरात अग्निशमन यंत्रणा पाचारण करण्यात आलेली आहे. 

तसेच श्री. एकविरा देवी मंदीर पायथा परिसर, पायऱ्यावर तसेच वेहेरगाव परिसरात असणारे सर्व हॉटेल दुकानदार विविध वस्तुविकी स्टॉल यामध्येदेखील दुकानदार यांना लहान आकाराचे अग्निशमन यंत्रणा ठेवण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. मंदीर व परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा व स्वयंमसेवक यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. 

     यात्रा काळात मंदिर परिसरात लागणाऱ्या विविध सुखसुविधा तसेच रोषणाई, फूल सजावट, अन्नदान, पाणीपुरवठा, रंगरंगोटी, चित्रिकरण, बंदोबस्तासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भोजनाची जबाबदारी एकविरादेवी दानशुर  भाविकांनी केली आहे. 

एकवीरादेवी यात्रेची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे.

सत्यसाई कार्तिक  (लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी) म्हणाले,” यात्रेस येणाऱ्या भाविकांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करत भाविकांनी अफवावर विश्वास ठेवू नये तसेच शिस्तीत यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा व यात्रा शांततेत साजरी करावी. 

किशोर धुमाळ,  पोलिस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण म्हणाले,”

यात्रा काळात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.भाविकांना पोलीस मदतीसाठी डायल ११२ या नंबरवर फोन करून मदत मागण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

You missed

error: Content is protected !!