‘देव कुठेतरी स्वर्गात,दानव कुठेतरी पाताळात व मानव पृथ्वीवर’ असा प्रकार प्रत्यक्षात नाही.माणसामध्येच देव-दानव-मानव असतात.कृष्ण हा देव होता तर त्या कृष्णाचा मामा कंस दानव होता व तोच कृष्ण ज्याच्या घरी वाढला तो नंद मानव होता.म्हणून माणसे ज्या पद्धतीने विचार करतात, बोलतात व आचार करतात त्यावर माणसे कशी होणार हे ठरत असते.
  दुसऱ्यांच्या दुःखाने सुखी होतो तो दानव, दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो मानव व दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतो तो देव जाणावा.
 विकार ज्यांना आवरता येतात ते मानव, ज्यांना आवरता येत नाहीत ते दानव व ज्यांच्या वृत्तीवर विकार उठतच नाहीत ते देव जाणावेत.
 एकमेकांना एकमेकांनी पाडण्याच्या प्रयत्नात सर्वच कोसळतात तर त्याच्या उलट एकमेकांना एकमेकांनी आधार दिल्याने सर्वच यशस्वी होतात.
 अक्कलशून्य माणसे दुसऱ्यांची निंदा-नालस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात, कारण ‘निंदा करणे’ ही एकच गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल लागत नाही.
 ‘तुम्ही इतरांचे भले कराल तर तुमचे भले होईल ,तुम्ही इतरांचे वाटोळे कराल तर तुमचे वाटोळे होईल’, हा निसर्गाचा अटळ नियम आहे.
 मूर्ख माणसे समस्या निर्माण करतात, तर सूज्ञ माणसे त्या समस्या सोडवितात.
सद्गुरू श्री वामनराव पै.

error: Content is protected !!