दुर्गांच्या देशातून…’चे दिमाखात प्रकाशन
पिंपरी:
“गडकिल्ल्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारा ‘दुर्गांच्या देशातून…’ हा दिवाळी अंक संग्राह्य आहे!” असे गौरवोद्गार माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे काढले. दुर्गभान प्रकाशननिर्मित आणि इतिहास अभ्यासक संदीप तापकीर संपादित ‘दुर्गांच्या देशातून…’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना अरुण बोऱ्हाडे बोलत होते. संतसाहित्याचे अभ्यासक आणि कीर्तनकार डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पिंपरी – चिंचवड महापालिका माजी उपमहापौर शैलजा मोरे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, ह. भ. प. भानुदास तापकीर, बीना एज्युकेशनल सोसायटीचे सचिव आझमखान, संपादक संदीप तापकीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
अरुण बोऱ्हाडे पुढे म्हणाले की, “गडकिल्ले हा विषय घेऊन सातत्याने बारा वर्षांपासून ‘दुर्गांच्या देशातून…’ या दिवाळी अंकाची निर्मिती केली जात आहे. या कालावधीत प्रत्यक्ष गडकिल्ल्यांना भेट देऊन केलेले लेखन आणि प्रत्येक वर्षी नवीन लेखकांना लिखाणाची संधी कटाक्षाने दिल्याने अंकाचा ताजेपणा, दर्जा टिकवून ठेवण्यात संपादक यशस्वी झाले आहेत. त्यामुळे बारा वर्षांपासूनचे एकत्रित अंक हादेखील इतिहास अभ्यासक, चोखंदळ वाचक यांच्यासाठी मोठा खजिना आहे!”
ह. भ. प. भानुदास तापकीर म्हणाले की, “यशाचे गौरीशिखर गाठण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागते, याचा प्रत्यय ‘दुर्गांच्या देशातून…’ या अंकातून मिळतो. प्रथितयश आणि नवोदित लेखकांची मांदियाळी, मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत अंतर्बाह्य उत्कृष्ट निर्मितीमूल्ये, अभ्यासपूर्ण आणि आशयघन लेख यामुळे अंक दर्जेदार झाला आहे!”
डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “आपली लोकसंस्कृती आणि आपला जाज्वल्य इतिहास हीच महाराष्ट्राची खरी सांस्कृतिक ओळख आहे. इतिहास या विषयाला वाहिलेल्या ‘दुर्गांच्या देशातून…’ अशा साहित्य संचिताचा ठेवा म्हणूनच अमूल्य आहे!” असे मत व्यक्त केले.
वसुबारसनिमित्त प्रतीकात्मक सवत्सधेनूचे पूजन आणि पणत्या प्रज्वलित करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राजेंद्र घावटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संदीप तापकीर यांनी आभार मानले.