शुक्रवारपासून वृक्षालय अभियानाचा शुभारंभ
पिंपरी:
प्रत्येक शाळेत पुस्तकांचे ग्रंथालय असते, त्याचप्रमाणे संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती अन् आवड निर्माण व्हावी, प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने लायन्स क्लब इंटरनॅशनल, प्रांत ३२३४ डी-२ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत ‘वृक्षालय’ निर्माण व्हावे, अशी अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी प्रांतपाल विजय भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले असून रमेश शहा आणि सुनील चेकर हे अनुक्रमे या उपक्रमाचे समन्वयक आणि सहसमन्वयक आहेत; तसेच आनंद आंबेकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे ११२ शाळांमध्ये प्रत्येकी १०० रोपे उपलब्ध करून देण्यात आली असून पिंपरी – चिंचवड, मावळ, पुणे शहर आणि पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा या परिसरातील इच्छुक शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना वेगवेगळ्या प्रकारची १०० रोपे विनामूल्य उपलब्ध करून दिली जातील. त्याचबरोबर त्या सर्व रोपांची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. ही माहिती शाळेच्या वतीने लॅमिनेट करून संबंधित रोपाच्या कुंडीशेजारी लावायची आहे. शाळेतील विद्यार्थी या रोपांचे वर्षभर निरीक्षण आणि संवर्धन करतील; आणि वर्षअखेरीस ती कुंडी त्या विद्यार्थ्याला किंवा जो मागेल त्याला, ज्याच्याकडे जागा उपलब्ध असेल त्याला विनामूल्य दिली जाईल. एक वर्षानंतर वृक्षालय उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करून त्यांना लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने आकर्षक बक्षीस आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. वृक्षालयाच्या या उपक्रमात जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन दामाजी आसबे (भ्रमणध्वनी – ९७६७१०२७१७) आणि देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले (भ्रमणध्वनी – ९८२२२४५६४५) यांनी केले आहे.

error: Content is protected !!