डॉ. संभाजी मलघे लिखित ‘बंधूतेचे झाड’ ग्रंथाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रकाशन
तळेगाव दाभाडे : येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्येष्ठ कवी डॉ. संभाजी मलघे लिखित ‘बंधूतेचे झाड’ या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीभूषण सुदाम भोरे होते. यावेळी ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, कवी पुरुषोत्तम सदाफुले, भरत दौंडकर, महेंद्र भारती, प्रदीप गांधलीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, की जगात रंग, जाती, भाषा, वेश वेगवेगळे असले तरी हे जग दिसायला अजूनही सुंदर दिसते. केवळ माणूस हरवत चालल्यामुळे ते मलीन दिसते. जनसंख्या ही समुद्राला आलेल्या भरतीसारखी पुढे चालली आणि त्यामध्ये माणूस हरवत चाललाय. अशा दृष्टीने माणसे उभी करण्याचे काम ‘बंधुतेचे झाड ‘या ग्रंथांमधून होत आहे. म्हणून हा ग्रंथ मला महत्त्वाचा वाटतो.
पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले, की पशुपक्ष्यांचा समाज नाही, माणसांचा समाज आहे. पशुपक्षी एक दुसऱ्याशी कसेही वागले तरी कोणी कोणाला विचारत नाही. पण समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीच्या बाहेर गेलात तर लोक बोटे उठवतात आणि ज्या माणसांच्या जीवनात बोटे उठवली जातात, असे जीवन जगून काय उपयोग ? म्हणून माणसे व माणुसकी हरवत जाण्याच्या या काळात ‘बंधूतेचे झाड’ हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. या ग्रंथाचे मी स्वागत करतो.
ग्रंथाचे लेखक डॉ. संभाजी मलघे म्हणाले, की स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यत्रयींपैकी कोणतीही मूल्यत्रयी कमी झाली, तर समाजात अस्थिरता निर्माण होईल. स्वातंत्र्य, समता जितकी महत्त्वाची, तितकीच बंधुताही महत्वाची आहे. या ग्रंथात बंधू भावाने समाज उभारण्यासंदर्भातील ललित लेखन केले आहे.
पद्मगंधा प्रकाशनाने हा ग्रंथ प्रसिद्ध केला असून, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा यांच्या वतीने सदर ग्रंथाचे प्रकाशन संपन्न झाले. लेखक डॉ. संभाजी मलघे यांनी उपस्थितांचे आभार मानले.