आचारविचार शुद्धतेच्या पाठीशी परमेश्वर:अण्णा हजारे
पिंपरी:
यमुनानगर, निगडीस्थित एकनाथ उगले लिखित ‘सुवर्णसुखाचा निर्झरू’ या ललित आत्मनिवेदनपर ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसुधारक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे केले.
“माणसाच्या आचारविचार शुद्धतेच्या पाठीशी परमेश्वर उभा राहतो म्हणून जीवनात नेहमी सद्सद्विवेक बुद्धीने वागावे!” असे अण्णा हजारे बोलत होते.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे पुरुषोत्तम सदाफुले, कविवर्य भरत दौंडकर, ह. भ. प. प्रभावती टपळे, रमेश टपळे, मनीषा उगले, वैष्णवी उगले, हरिप्रसाद उगले, चैतन्य टपळे, युवा उद्योजक सुदर्शन माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कवी दत्तात्रय जगताप यांच्या ‘तू फक्त बाई नाहीस!’ या कवितासंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले.
त्यानंतर आदर्शगाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांनी ‘सुवर्णसुखाचा निर्झरू’ या ग्रंथाला शुभेच्छा देताना, “एकनाथ उगले यांच्या आत्मकथनाला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले आहे, ही बाब गौरवास्पद आहे; कारण आताच्या काळात माणूस उच्चशिक्षित होताना आपली संस्कृती, आपली माती आणि नातीगोती विसरतो, ही गंभीर गोष्ट आहे. अशा ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या उज्ज्वल परंपरांचे पुनरुज्जीवन निश्चितपणे होईल!” असे विचार मांडले.
लेखक एकनाथ उगले यांनी आपल्या मनोगतातून, “बालपणापासून मनावर अध्यात्माचे संस्कार घडल्यामुळे आदरणीय बाबामहाराज सातारकर यांचे आशीर्वाद, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रकाशन आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभेच्छा माझ्या ‘सुवर्णसुखाचा निर्झरू’ या पहिल्याच पुस्तकाला लाभल्याने मनात कृतार्थतेची भावना आहे!” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. कवी प्रभाकर वाघोले यांनी शुभेच्छा दिल्या. प्रदीप गांधलीकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!