शंकर म्हणतो तथास्तु
प्रत्येक मनुष्याला मनापासून असे वाटत असते की,भगवंताने आपले सर्व संकल्प व मनोरथ पूर्ण करावेत.श्री ज्ञानेश्वर माऊली सुद्धां देवाजवळ मागणे मागतात की,”जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात” वास्तविक,आपण देवाजवळ लडिवाळपणे मागायचे व देवाने आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या अशी व्यवस्था निसर्गाने ईश्वराने आपल्या जीवनातच करून ठेवली आहे.
निसर्गाने अशी सुरेख व्यवस्था करून सुद्धां आज आपली अवस्था मात्र केविलवाणी झाली आहे याचे एकमेव कारण हे की, माणसाला निसर्गाने आपल्यासाठी अशी व्यवस्था करून ठेवली आहे याची मुळीसुद्धां जाणीव नाही.कल्पतरुच्या झाडाखाली बसले असता आपण जे मागावे ते तत्काळ प्राप्त होते असे पुराणांत उल्लेख सापडतात.
पुराणातील वांगी पुराणातच! त्याचा आपल्याला उपयोग काय?असे वाटण्याचा संभव आहे.परंतु हा कल्पतरू पुराणातले वांगं नसून आपले जीवन चांग व सांग करणारा प्रत्यक्ष शंकरू आहे.हा शिव शंकर आपल्या हृदयात वास करतो व आपण जे काही मागतो त्या सर्व मागण्यांना तथास्तु म्हणतो.प्रत्यक्ष शंकराने तथास्तु असा आशीर्वाद दिल्यावर आपल्या मागण्या फलद्रूप झाल्याशिवाय कशा राहतील?
परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की,आपले मागणे योग्य की अयोग्य,चांगले की वाईट,बरे की बुरे,कल्याणाचे की अकल्याणाचे याचा शंकर ‘विचार’ करत नाही.तथास्तु म्हणायचे व आपल्या कामना पूर्ण करायच्या इतकेच हा शंकर जाणतो. चांगल्या-वाईटाचा किंवा हित-अहिताचा जो कांही विचार करायचा तो आपण;शंकराने नाही.निसर्गाची ईश्वराची वरील व्यवस्था न समजल्यामुळे आपल्या सारखी सामान्य माणसे शंकराजवळ जे मागावे ते मागत नाहीत व जे मागू नये ते नेमके मागतात.
याचा परिणाम असा होतो की,आपल्या वाट्याला जीवनात दुःखाचा सुकाळ व सुखाचा दुष्काळ अनुभवास येतो.पुराणातील भस्मासुराची कथा सुप्रसिद्ध आहे. भस्मासुराने वर मागितला की, ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो भस्म व्हावा व त्यास शंकराने त्याच्या भोळ्या स्वभावाप्रमाणे तथास्तु म्हटले.शेवटी भस्मासुराने स्वतःच्याच मस्तकावर हात ठेवला व तो भस्म झाला.पुराणातील ही भस्मासुराची कथा म्हणजे प्रत्यक्षात सामान्य माणसाची व्यथा आहे.
कळत नकळत आपण देवाजवळ नको ते मागतो व हा शंकर तथास्तु म्हणतो.परिणामी आपल्या जीवनात वादळ व गोंधळ निर्माण होऊन प्रत्यक्षात सुखाचे सोने प्राप्त होण्याऐवजी जीवनात दुःखाची माती मात्र पदरात पडते.या बाबतीत निसर्गाचा किंवा ईश्वराचा एक नियम लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.हा नियम असा की, “आपण जे करतो ते देवाजवळ मागतो” कारण “करणे’ हे एक प्रकारचे मागणेच आहे.हे ‘करणे’ दोन प्रकारचे आहे. एक मनाने करणे व दुसरे देहाने करणे.
यापैकी “मनाने करणे” या गोष्टीला अधिक महत्त्व आहे.कारण देहामार्फत जे केले जाते ते प्रत्यक्षात मनच करीत असते.ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे मनाचे जीवनातील असाधारण महत्त्व ध्यानात येईल. जागतिक युद्धात (World War) युद्धातील डाव पेच (War Strategy) या दृष्टीने स्पेनमधील जिब्राल्टरला अतीव महत्त्व आहे. ज्याच्या हातात जिब्राल्टर त्याच्या बाजूला युद्धात जय नक्की असे ठरून गेल्यासारखे आहे. आपले जीवन हे सुद्धां नाटक,संगीत, जुगार किंवा खेळ नसून युद्ध आहे.
रात्रं दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ।।या शब्दात तुकाराम महाराजांनी सुद्धा जीवन हे युद्ध आहे असेच उपदेशीले आहे.या जीवन युद्धात मनाचे स्थान जिब्राल्टरसारखे अतीव महत्त्वाचे आहे.ज्याच्या हातात मन तो जीवन युद्ध जिंकणार हे निश्चित.असे हे मन अत्यंत विचित्र व विलक्षण आहे याची जाणीव आपल्या सारख्या सामान्य माणसाला नसते.हे मन प्रत्यक्षात तीन प्रकारे नांदते.या मनाच्या एका प्रकाराला बहिर्मन म्हणतात,दुसऱ्या प्रकाराला अंतर्मन म्हणतात,तिसऱ्या प्रकाराला दिव्य मन असे म्हणतात.
*Conscious mind,*
*Sub-Conscious mind and*
*Divine Consciousness.*
असेही म्हणतात.यांना जीव,शिव व देव असेही स्थूलमानाने संबोधण्यास हरकत नाही.सध्या आपल्याला पहिल्या दोन तत्त्वांशी कर्तव्य आहे ती म्हणजे बहिर्मन व अंतर्मन ही होत.ही दोन मने वास्तविक दोन नसून एकाच मनाचे दोन भाग आहेत.परंतु त्या दोघांची कार्य करण्याची पद्धत व कार्यक्षेत्र भिन्न आहेत व त्यामुळेच हे एक मन नसून दोन भिन्न मने आहेत असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण होते.बहिर्मन अत्यंत छोटे आहे तर अंतर्मन खूपच मोठे आहे.बहिर्मन स्थूल आहे तर अंतर्मन अतिसूक्ष्म आहे.
बहिर्मन प्रतितीला येते तर अंतर्मनाचा थांगपत्ताही सामान्य माणसाला लागत नाही.अशी दोन मने कशा स्वरूपाने आपल्या जीवनात नांदतात, पुढे पाहू.
सद्गुरू श्री वामनराव पै
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन