गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार: मसूद पटेल
पिंपरी:
“गझल हा अभिव्यक्तीचा उत्कट काव्यप्रकार आहे!” असे मत ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल यांनी खुशबू, सिल्व्हर गार्डन, चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आयोजित ‘साहित्य संवाद’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मसूद पटेल बोलत होते. सतीशसिंह मालवे (अमरावती) आणि नीलेश शेंबेकर (पिंपरी – चिंचवड) यांच्या गझलांचे सादरीकरण आणि त्यावर ज्येष्ठ गझलकार रघुनाथ पाटील यांनी केलेले भाष्य असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, नंदकुमार मुरडे, प्रदीप गांधलीकर, सुहास घुमरे, प्रा. दिनेश भोसले, प्रशांत पोरे, हेमंत जोशी, संदीप जाधव, समरसता साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष अरविंद दोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. समरसता साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष उज्ज्वला केळकर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी सतीशसिंह मालवे आणि नीलेश शेंबेकर यांनी सादर केलेल्या गझलांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. भाष्यकार रघुनाथ पाटील म्हणाले की, “आयुष्य समर्पित करून सुरेश भटसाहेबांनी मराठीत गझल रुजवली. त्यामुळे मराठी गझलकारांच्या सशक्त पिढ्या निर्माण झाल्या आहेत.
“गावाकडे भले माझे शिवार नाही…” ही मालवे यांची रचना रानकवी ना. धों. महानोर यांच्या कवितेची आठवण करून देते. ‘माणसे’ ही गझल माणसातील वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन घडवते; तर ‘पक्षी’ ही रचना प्रत्येक कष्टकरी बापाला मानवंदना देते. “या नभाचे त्या नभाशी काही न देणे घेणे…” ही शेंबेकर यांची अतिशय तरल अभिव्यक्ती ते नव्या पिढीतील एक दमदार गझलकार आहेत, या गोष्टीचा प्रत्यय देणारी आहे.
अभय पोकर्णा, मीना पोकर्णा, कैलास भैरट, जयश्री श्रीखंडे, राजेंद्र भागवत, सुप्रिया लिमये यांनी संयोजनात सहकार्य केले. समृद्धी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले.
- मराठी माध्यमांच्या शाळा स्मार्ट व डिजिटल बनवणे काळाची गरज – संतोष खांडगे
- सदाबहार गीतांनी दिला चिरतारुण्याचा प्रत्यय
- रविवार,०५ जानेवारीला तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन
- महर्षी कर्वे आश्रम शाळेचे सोळावे वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न
- मावळात आज पासून किर्तन महोत्सव : आमदार सुनिल शेळके व विठ्ठल परिवाराचा पुढाकार