तळेगाव दाभाडे:
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सन १९९५ सालच्या ॲड. पु.वा.परांजपे विद्यामंदिर तळेगाव दाभाडे या बॅचचे इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यानी तळेगाव स्टेशनच्या तळे परिसरात दोनशे फळझाडे लावून स्वातंत्र्यदिन साजरा केला.
आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो ही भावना त्यामध्ये होती.माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत हे वृक्षारोपण केले. १९९५ सालातील दहावीच्या बॅचचे ६५ मुले आणि मुली यांनी हा उपक्रम राबविला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या थोर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ‘ स्मृतीवन’ निर्माण करून हुतात्म्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न असल्याच्या भावना संजय बाविस्कर यांनी व्यक्त केल्या.
यासाठी नगरपालिकेने फक्त त्यांना जागा उपलब्ध करून दिली. या स्मृतीवनात फळांची झाडे लावण्यात आली. फणस, चिंच, चिकू, पेरू, जांभूळ, आंबा यासारखी पाच ते सहा फूट उंचीची झाडे व यासाठी लागणारा सर्व खर्च या विद्यार्थ्यांनी केला. शेजारीच तळेगावच्या सृष्टी सौंदर्यामध्ये भर घालणारे भव्य मोठे तळे, याच्या शेजारी असलेले हे स्मृतिवन त्यामध्ये अधिक खुलून दिसेल.
निरनिराळे पक्षी व त्यांना आकर्षित करणारं स्मृतीवन नक्कीच पर्यावरणाला भुरळ घालणारे ठरेल. साहजिकच यामध्ये निसर्ग सौंदर्याची भर पडेल.युवाशक्ती एकत्र आले की विधायक काम किती समर्पकपणे आणि उठावदार होऊ शकते याची या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचिती आली असल्याच्या भावना माजी विद्यार्थ्यानी व्यक्त केल्या.
संजय बाविस्कर म्हणाले,”
पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना शासन पातळीवर अनेक उपक्रम राबविले जातात परंतु त्याचं जतन व संवर्धन करणे हे समाजाचाही काम आहे.
या उद्घाटन प्रसंगी महेश महाजन (पर्यावरण प्रेमी), त्या वेळचे वर्गशिक्षक बी.जी.अंभोरे, सध्याचे शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अमोल बुडखुले यांनी केले. अजूनही विविध कार्यक्रम राबविले जातील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.महेश महाजन यांनी पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला त्याचे कौतुकही केलं.
दोनशे झाडांची जतन करण्याची जबाबदारी या सर्व विद्यार्थ्यांनी घेतली प्रत्येक पंधरा दिवसांनी झाडाची पाहणी करून त्यापैकी किती झाडे जगलीत. जे झाड जगलं नसेल तर त्या जागी दुसरे झाड लावून ते वाढवू अशी ग्वाही सचिन भेगडे* यांनी दिली. अंभोरे यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केलं. सामाजिक बांधिलकी जपणारी ही बॅच समाजासाठी एक आदर्श म्हणून ओळखली जाईल. पुढील बॅचनी याचं अनुकरण करावं पर्यावरण पूरक व समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतील आणि राबवतील असा आशावादही व्यक्त केला.
मुख्याध्यापक पांडुरंग पोटे म्हणाले,” ॲड्.पु.वा.परांजपे शाळेचे विद्यार्थी हे नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवून काहीतरी वेगळं निर्माण करतात यांचा शाळेला खूप मोठा अभिमान वाटतो.१९९५ सालाच्या बॅचने हाती घेतलेला उपक्रम खरोखरच कौतुकाची बाब आहे.रुपाली प्रयाग यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संजय बावीसकर, चंद्रकांत थिटे, निलेश कोतुळकर, प्रशांत साखरे, अनिरुद्ध जोशी, प्रशांत गुमल, मंगेश सरोदे, शाम जव्हेरी, अविनाश भेगडे, राजश्री कुलकर्णी, दीपाली गुरव यांच्यासह अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी पुढाकार घेतला.