०९ ऑगस्ट रोजी भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा
पिंपरी:
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे यांच्या वतीने भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते बुधवार, दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ विभागाचे संचालक सचिन ईटकर सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार असून टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांची मुख्य अतिथी म्हणून तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थिती राहील.
या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार), रवींद्र डोमाळे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगभूषण पुरस्कार), सोनाली किरण ढोकले (भारतरत्न जे. आर. डी. टाटा ग्रामभूषण पुरस्कार), दीपक भोंडवे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा युवा कृषी उद्योगभूषण पुरस्कार), नीलेश रामाणे (भारतरत्न जे. आर. डी. टाटा युवा उद्योजक पुरस्कार), अमर लाड (भारतरत्न जे. आर. डी. टाटा युवा उद्योजक पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
विनाशुल्क असलेल्या या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदाम भोरे आणि कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले.