अनुत्तरीत प्रेमाची खरी हकीकत केली दोघांनी कबूल
गाव कुसावर देशपांडे नावाचं एक कुटुंब राहत होते.जातीने ब्राह्मण असलेलं हे कुटुंब त्या गावातील एक भूषणच होते.तसे पाहिले तर या गावात मराठी,सुतार, चांभार,शिंपी, मांग,लोहार, ठाकर, तेली,गवंडी,कैकाडी, गुरव,अशा अठरा पगड जाती राहत होत्या.अशा अठरा पगड जातीचा भरणा असलेलं हे गाव मात्र स्वावलंबी झालेलं होते.गावातील गरजा गावातच पूर्ण होत होत्या.सगळी कडे जो तो आपल्या व्यवसायात रमलेला होता.
देशपांडे यांचे घर म्हणजे कमालीची स्वच्छ्ता होती.घर हे कौलारू होते.घरापुढे प्रशस्त असे अंगण होते. अंगणाला कायम स्वरुपी शेणानी सारवलेल असे.घरा मध्ये सूरज देशपांडे,त्यांची गृहलक्ष्मी राधा,विमल नावाची पाच वर्षाची मुलगी,आणि वयस्कर आई, बाबा असा जेमतेम पाच जणांचा हा परिवार आनंदाने राहत होता.सूरजने वैदिक धर्माची विद्या ही वडिलांकडून शिकवून घेतली होती.
गावातील पूजा,अर्चा,वास्तुशांती, सत्य नारायणाची पूजा ,असे वैदिक धर्माचे सर्व कार्यक्रम सूरज पार पाडत असे.त्याच्या वरच त्यांचे घर चालले होते. घरासमोर शोभेची झाडे घराला घरपण देत होती.घराच्या मागे छोटीशी परसबाग होती त्या मध्ये जाई ,जुई ,सदाफुली,मोगरा,पारिजातक,अशा विविध फुलांच्या जाती असलेली झाडे होती.त्या मधून ती फुले तोडून देशपांडे गावातील चार पाच मंदिरात त्यांचे हार बनवून मूर्तीची पूजा करीत होते.
पाच वर्षाची त्यांची मुलगी विमल स्वभावाने खूप लागवी होती.चुणचुणीत आणि कोणालाही आवडणारी होती.रंगाने प्रचंड गोरी,तिच्या वयाला शोभणारी उंची,विस्तीर्ण भालप्रदेश,लांबसडक पाठीवरती रुळणारे केस,पायात असणारे गुंगरू युक्त पैंजण,तिच्या सौंदर्यात भर घालत होते. शाळेत जाण्याचे वय झाल्या कारणाने तिच्या वडिलांनी सहाव्या वर्षी तिला गावातील शाळेत पाठवले होते.घरातील पुरुष प्रधान संस्कृतीने ती सदा लाजलेली, व शाळेत कधीही मनमोकळेपणाने वावरलीच नव्हती.
अभ्यास,आणि घरातील अध्ययन यामुळे ती शिक्षणात खूप प्रभावी ठरत चालली होती.
शाळेचे दिवस पटपट जात चालले होते.प्रत्येक वर्षी विमलचा शाळेत पहिला नंबर ठरलेला होता.प्रजासत्ताक दिन,स्वातंत्र्य दीन ,या दिवशी गावातील सरपंच आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत विमलचा सत्कार होत होता.हे पाहून सूरज आणि त्यांची गृहलक्ष्मी राधा यांना खूप आनंद होत होता. आपल्या पोटी एकुलती एक कन्या जन्माला आली परंतु तिने आपल्या नावाचा उदोउदो सगळ्या पंचक्रोशी मध्ये केला याचा त्यांना सार्थ अभिमान होता.कारण विमल नंतर त्यांना कोणतेही मुल बाळ नव्हते.
विमल ने आता माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला होता.माध्यमिक शाळा सुध्दा गावात च होती.त्यामुळे तिला गावात राहूनच शाळा शिकता येणार होते.
शाळेतून घरी गेल्यानंतर अभ्यासा व्यतिरिक्त ती आपल्या आईला मदत करत होती.स्वैपाक तर ती खूप सुंदरच बनवत होती.अभ्यासामुळे गावाची तर घरातील कामामुळे घरच्या लोकांची चाहती झाली होती. ज्या वर्गात ती शिकत होती त्याच वर्गात राजेश नावाचा मराठी समाजाचा मुलगा ही शिकत होता.
राजेश शेतकरी कुटुंबातला असल्या कारणाने शरीर भरलेलं होते.निमगोरा असणारा राजेश याच्या डोक्यातील टोपी जर काढली तर एखाद्या हिरोला लाजवील अशी त्याची केश रचना होती.स्वभावाने नम्र,आणि सदसद्विवेक बुद्धी ने युक्त असा त्याचा स्वभाव सगळ्या वर्गात चर्चेचा विषय झाला होता.त्याच्या नम्र स्वभावामुळे आणि चांगल्या देहयष्टी मुळे वर्गातील वर्गशिक्षक असलेले खानदेशी सरांनी त्याला मॉनिटर म्हणून नियुक्त केले होते.
तो काळ म्हणजे मुलींनी कधीही मुलांबरोबर बोलायचे नाही आणि पहायचे नाही असाच होता.काही गरज लागली तर खुणेची परिभाषा समजली जात होती.
त्या दिवशी शाळेला सुट्टी होती.विमल गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. दुपारचे बारा वाजले होते. आजू बाजूला चिटपाखरू ही नव्हते.एका वर एक असे दोन हंडे पाणी नेण्यासाठी विमल घेऊन आली होती.तिथे असणाऱ्या बादली ने तिने दोन्ही हंडे भरले होते.परंतु ती उचलून देणाऱ्यांची वाट पहात होती.
बराच वेळ झाला होता कोणीही तिथे दिसत नव्हते.काही कारणास्तव रानात गेलेला राजेश विहिरीवर पाणी पिण्यासाठी पोहचला होता.पहातो तर विमल कोणाची तरी वाट पहात होती.वर्गात कधी ही संभाषण न झालेली विमल आणि राजेश एक मेकाकंडे पहात होती.पहिल्यांदाच ते एकमेकांना निरखून पहात होते.तिच्यातले ते निखळ सौंदर्य पाहून ईश्वरालाही भुरळ पडावी असा तो चेहरा प्रथम दर्शनी दिसला तेव्हा स्वर्ग पाताळ एक झाल्यासारखे वाटू लागले होते.”अरे राजेश एवढा हंडा माझ्या डोक्यावर ठेव ना” असा मंजुळ आवाज त्याला ऐकू आला होता.
त्याने पाणी पिणे सोडून विमलची आज्ञा शिरसावंद्य मानून तिच्या डोक्यावर हंडा उचलून दिला होता.विमल एकावर एक दोन हंडे घेऊन घरच्या दिशेने जात असताना तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे राजेश पहातच होता.वर्गातील सगळ्यात हुशार,देखणी,आणि लाजलेली विमल, पहिल्यांदा त्याच्या बरोबर बोलली होती.राजेशच्या मनात काहूर माजले होते.खरेच आपल्या आयुष्यात विमल आली तर आपल्या आयुष्याला रंगतच येईल ना? असे तो मनातल्या मनात पुटपुटत आल्या रस्त्याला लागला होता.सूर्यास्त होऊन बऱ्याच वेळाने राजेश घरी आला होता.सूर्यास्ताचा संधिप्रकाश त्याला हवाहवासा वाटू लागला होता.तांबूस मय प्रकाशात त्याला तो विमलचा निरागस चेहरा दिसू लागला होता.पुन्हा पुन्हा तिचा आवाज कानावर अलगद येऊन आदळत होता,”अरे राजेश एवढा हंडा उचलून दे ना”
रात्री जेवणाची वेळ झाली होती.जेवणावर त्याचे लक्ष लागत नव्हते. अगोदरच्या दिवसात त्याचे कधी ही विमल बरोबर बोलणे झाले नव्हते परंतु या निमित्ताने कर्मधर्म सयोंगाने योग जुळून आला होता.
वर्गात सुध्दा चोरून एकमेकांकडे पहात होते.जसे राजेश अनुभवत होता त्याच प्रमाणे विमल ची सुध्दा तीच अवस्था झाली होती.परंतु मनातून ते दोघे ही घाबरत होते. कारण जात आडवी येत होती.तो मराठा तर ती ब्राह्मण,त्या काळात याला खूप जपल जात होत.
असे एक वर्षे गेले होते.दोघांचा ही एकमेकांवर खूप जीव जडला होता.परंतु व्यक्त होत नव्हता.शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये दोघांचाही सहभाग होत होता.कधी तरी वेळ साधून मी विमल ला माझ्या मनातील विचारांचं काहूर सांगेन आणि ते व्यक्त करण्यात मला यश येईल असे खात्रीपूर्वक राजेश ला वाटत होते.परंतु भीतीने दोघांनाही ग्रासल होते.पावसाळी क्रीडा स्पर्धेत दोघांनीही आपल्या वर्गासाठी बाजी मारली होती.शाळेत चाचणी परीक्षेत ही दोघेही सरस ठरत होते.त्यांच्या दोघांच्या ही आयुष्यातील माध्यमिक शाळेतील शेवटचे वर्षे होते.म्हणजेच दोघांनाही शालांत परीक्षा पार करावी लागणार होती.
विमल ने सहामाई परीक्षेत घवघवीत यश संपादन केले होते.अभ्यासावर तिने पूर्ण लक्ष केंद्रित केले होते.सराव परीक्षा होऊन शालांत निरोप समारंभ शाळेत आयोजित केला होता.त्या दिवशी सगळे विद्यार्थी एका वेगळ्या वेशभूषेत येणार होते.विमल ने पिंक कलरची साडी घातली होती.मुळातच ती दिसण्यात सुंदर आणि असा हा पेहराव तिची सुंदरता वाढवण्यास पोषक ठरत होता.चित्रपटातील अभिनेत्रीला लाजवील असा श्रंगार करून विमल आपल्या मैत्रिणी सोबत आली होती.इकडे राजेश सुध्दा फुल पँट, फुल शर्ट, घालून डोक्यावरील हिप्पी कट ठेवत त्या ठिकाणी पोहचला होता.एकमेकांची नजरा नजर झाली होती.त्या वर्गाला आणि सगळ्या वर्गाना शिकवत असलेले सर मंडळी सुध्दा उपस्थित होते.
एकमेकांचे अनुभव प्रत्येक जन सांगत होता.विमल ने दहा मिनिटांच्या अवधीत सगळ्या सरांचे, विद्यार्थी,विद्यार्थिनीचे आणि आपल्या माता पित्यांचे आभार मानताना सर्व सरांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणले होते.कार्यक्रम होत असताना राजेश विमल च्या प्रेमात बुडून गेला होता.त्या दिवशी घरी आल्यानंतर विमलला राजेशचा चेहरा दिसत होता तर राजेशला विमलच सौंदर्य लुभावत होते. दुसऱ्या दिवशी एस. एस. सी. ची वार्षिक परीक्षा चालू होणार होती.कोणाचा नंबर कोणत्या तुकडीत येणार हे माहीत नव्हते.म्हणजेच परीक्षा होत पर्यंत मुख दर्शन होणार नव्हते.परीक्षा संपली तशी विमलच्या घरी एक वेगळीच चर्चा रंगली होती.विमलने तसे सोळावं वर्षे पूर्ण करून सतराव्या वर्षात पदार्पण केले होते.
त्यावेळी ते वय म्हणजे लग्नाचे वय असे मानले जात होते.दूरच्या तालुक्यातील त्यांचे नातेवाईक घरी आले होते.विमल ला पहाण्यासाठी त्यांचे आगमन झाले होते.जसे या पाहुण्यांना तिने पाहिले तसे ती अर्धगळीत झाली होती.काय करावे काहीही सुचत नव्हते तिला तर निरोप समारंभ मधला राजेश हवा होता.परंतु नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते.दुसऱ्या दिवशी घरातील सर्व मंडळी घराला कुलूप लावून विमल सह तालुक्याच्या ठिकाणी गेले होते.विमल मध्ये विमल राहिलीच नव्हती.तिला आत्महत्येचा विचार येत होता.परंतु राजेश बरोबर या बाबतीत कधी ही चर्चा झाली नव्हती भीती पोटी ब्रह्म राक्षस अशी परिस्थिती तयार झाली होती.कधी कधी राजेशला ते चित्रपट गीत आठवत होते.
!!प्यार करने वाले कभी डरते नही जो डरते है वो प्यार करते नहीं !!
परंतु हे चित्रपटालाच शोभून दिसते.
एका आठवड्यातच विमलचे लग्न एका नात्यातील मुलाबरोबर झाले होते.तिच्या स्वप्नातला राजेश रुपी राजकुमार स्वप्न बनुनच राहिला होता.इकडे राजेश ज्या वेळी तिच्या घराकडे चक्कर मारायला आला तेव्हा त्यांच्या शेजारच्या कडून तिच्या लग्नाचं समजल होत.राजेश अंतकरणातून तुटला होता.विमल ने मला का सांगितलं नाही ?तर विमल ला सुध्दा वाटत होते की राजेश ने माझ्याशी काहीच बोलला का नाही? असे विचार दोघांच्याही मनात येऊन गेले होते.त्या नंतर राजेश चे सुध्दा काही वर्षाने लग्न झाले होते.दोघांनाही मुल झाली होती.
बरोबर तीस वर्षाने त्यांच्याच वर्गातील व्यवसायाने शिक्षक असलेल्या मुलाने स्नेह संमेलन घेण्याचा विचार केला व त्या वेळी तेव्हाचे सगळे विद्यार्थी ,विद्यार्थिनी, सर,त्या कार्यक्रमाला आले होते.
आणि मग मागील आठवणींना उजाळा देत अनुत्तरीत प्रेमाची खरी हकीकत दोघांनी ही कबूल केली होती. दोघांनीही एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले होते.दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू वहात होते. ज्यावेळी हे होणे गरजेचे होते त्यावेळी भीती नावाचा राक्षस त्यांच्या मध्ये आला होता.प्रेम हा अडीच अक्षर असलेला शब्द परंतु जीवनाला किती आकार देण्याचा प्रयत्न करतो हे मात्र कळून उरले होते.( ही कथा काल्पनिक आहे,नावे ही संदर्भ म्हणून वापरली आहे.)
शब्दांकन- बाळासाहेब मेदगे,औदर