तळेगाव स्टेशन:
मामासाहेब खांडगे विद्यालयात विद्यार्थ्यांनी ‘आषाढी वारीचा’ आनंद लुटला. मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पूर्वप्राथमिक गटापासून इ .१० वी च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
पांडुरंगाच्या आरतीने पालखी पूजन करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विठ्ठल व रुक्मिणी व वारकऱ्यांची वेषभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. छोट्या बालचमूंनी देखील संत तुकाराम, संत निवृत्ती, संत जनाबाईंची वेशभूषा धारण केली होती.यावेळी ज्ञानोबा-माऊलींच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
त्याचबरोबर इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गजरात टाळ आणि मृदंगाच्या तालावर लेझीम आणि रिंगण सादर केले. कु. अंतरा पाटील (इ.८वी) ह्या विद्यार्थिनीने वारीचे महत्व, वारीची परंपरा याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. दिंडीतून ‘निर्मल वारी,हरित वारी,त्याचप्रमाणे ‘झाडे लावा, झाडे जगवा ‘ असे सामाजिक संदेश देत वारीचा आनंद द्विगुणित केला.
नृत्य तसेच फुगडी खेळत प्रत्यक्षात पंढरपूरच्या भक्तीमय वातावरणाची अनुभूती उपस्थितांना यामुळे झाली. या नयनरम्य आणि भक्तीमय वारीचा समारोप वारकरी संप्रदायाच्या प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांनीही या सोहळय़ात उत्साहाने भाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका धुमाळ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन, व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.