गत जीवनाची याद नको…फिरून तो कधी न येतो!
खंत तयाची कधी न कर… आजचा दिवस साजरा कर!
आजचा दिवस साजरा कर!!
होय मित्रांनो,
जगात पैसा हा सर्वात शक्तिशाली असतो असं जरी असलं तरी काही गोष्टी आपण पैशाने निश्चितच विकत घेऊ शकत नाही! आणि त्या गोष्टीचं खरोखर मोलही करू शकत नाही.

त्यापैकीच प्रत्येकाच्या आयुष्यातलं बालपण आणि तारूण्य असतं! मित्रांनो- खरच परमेश्वराने माणसाच्या आयुष्याची मांडणी अशीच केलेली  आहे की– तो सारखा भवितव्याच्या मृगजळामागे सातत्याने धावत असतो.

आणि नकळत आपल्या भूतकाळाकडे तो पाठ फिरवतो!पण धावताना केव्हातरी  त्याला धाप लागते आणि मग मित्रांनो त्याला गमावलेल्या भूतकाळातील आनंदाची अनुभूती  स्पर्श करून जाते!  कारण त्याचा तो भूतकाळ त्याला अभूतपूर्व आनंद देणारा असतो! त्याच्या शाळेतील प्रत्येक वर्गातील तिजोरीत तो आनंद खच्चून भरलेला असतो.

त्याच बालकवींच्या कविता असतात!  खांडेकरांचे लघुनिबंध असतात!  न सुटणारी गणित असतात भारावून  टाकणारा इतिहास असतो! गुरुजींनी केलेली शिक्षाही असते आणि त्यांनी दिलेली दीक्षा ही असते! त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात ओल्या मातीचा सुगंधही असतो.

मित्रांनो पुढे तो आपल्या कार्यकर्तृत्वाने आमदार होईल! खासदार होईल नव्हे राष्ट्रपती बनुन  राष्ट्रपती भवनात जाऊन बसेल परंतु त्याला पाचवी ते आठवीच्या वर्गात कधीच बसता येणार नाही ही खंत आणि त्याची जाणीव त्याला सतत होत असते म्हणून आता त्याला फक्त आठवणींच्या सरोवरात डुंबायचं असतं.

आणि हे त्याचं डुमण फक्त मित्रांच्या सहवासात त्याला शक्य होतं! तो बालपणाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळण्यासाठी त्याने मित्रांची कदर केली पाहिजे! मित्र जोडले पाहिजेत ते जपले पाहिजे! कारण आमचा शायर असं म्हणतो की -दुनिया एक सराह है! यहा की हर चीज आनी जानी देखी है! जैसे जाकर न आये वह जवानी देखी है!

और जो आकर् न जाये वह बुढापा भी देखा है! मित्रांनो- हे किती विदारक पण कटू असं सत्य आहे! आणि या सत्याला आपली इच्छा असो वा नसो  प्रत्येकालाच सामोरं जावंच लागतं म्हणून आनंदानं त्याचा स्वीकार करण हेच आपल्या हाती आहे! मित्रांनो मला वाटतं हा चिंतनाचा विषय आपण आज इथेच थांबूया!
(शब्दांकन- ला.डाॅ.शाळिग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!