वास्तव आणि कल्पना यांचा समन्वय आनंददायी: प्रा. तुकाराम पाटील
पिंपरी:
“वास्तव आणि कल्पना यांचा समन्वय आनंददायी असतो. ‘प्रवासातील आनंदधून’ या पुस्तकातून याचा प्रत्यय येतो!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी ड्रीमलॅण्ड बँक्वेट हॉल, विशालनगर, पिंपळे निलख येथे व्यक्त केले.
माधुरी विधाटे लिखित आणि संवेदना प्रकाशन निर्मित ‘प्रवासातील आनंदधून’ या प्रवासवर्णनपर ललितसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. तुकाराम पाटील बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, माजी पोलीस आयुक्त मारुती महेशगौरी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. कैलास कोहिनकर, सहाय्यक वन संरक्षक संजय कडू, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी – पुणे डॉ. शिवाजी विधाटे, ॐ साई टूर्सचे संचालक विनायक गुहे, माजी नगरसेविका आरती चौंधे, खेड पंचायत समिती माजी सभापती सुरेश शिंदे यांची व्यासपीठावर तसेच साहित्य, संस्कृती, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. प्रितेश विधाटे यांनी टिपलेल्या निसर्गाविष्कार, पक्षी, प्राचीन संस्कृतीच्या विविध छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रा. तुकाराम पाटील पुढे म्हणाले की, “आपली नाळ मातीशी जोडलेली असल्याने निसर्गचित्रे पाहून अन् निसर्गवर्णन वाचून आपल्याला मनस्वी आनंद होतो!” अरुण बोऱ्हाडे यांनी, “माधुरी विधाटे यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीतून पर्यटनाची आनंदधून मांडून वाचकांना अवर्णनीय आनंद दिला आहेच; पण त्याचबरोबर त्यांनी जपलेली संवेदनशीलता अन् मानवता मनाला भावते!” असे गौरवोद्गार काढले.
लेखिका माधुरी विधाटे यांनी आपल्या मनोगतातून, “सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या सासवड या गावातून मिळालेल्या लेखनाच्या बाळकडूला आईवडील, गुरुजन, आप्तेष्ट आणि विवाहपश्चात पती, सर्व कुटुंबीय आणि साहित्यिक परिवार यांनी प्रोत्साहन देऊन वृद्धिंगत केले. स्मरणरंजनाच्या आनंदक्षणांना पुस्तकरूपाने वाचकांपर्यंत पोचवताना कृतार्थ झाल्यासारखे वाटते!” अशा भावना व्यक्त केल्या. संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे यांचे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी व्यक्त केले.
संजय कडू यांनी, “छायाचित्रण ही एक कला असून त्यासाठी केलेली साधना छायाचित्रांच्या माध्यमातून प्रतीत होते!” असे मत व्यक्त केले. विनायक गुहे यांनी, “जगण्याचा दर्जा आपल्या परिस्थितीवर नाही तर विचारांवर अवलंबून असतो!” असे मत व्यक्त केले. डॉ. शिवाजी विधाटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.भगतसिंग कदम, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.शशिकांत डुंबरे, पिंपळोली गावाचे सरपंच बाबाजी शेळके, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दादाभाऊ विधाटे यांची तसेच माधुरी ओक, शोभाताई जोशी, रजनी अहेरराव, मंगला पाटील, संपतराव शिंदे, अश्विनी कुलकर्णी, सविता इंगळे, वर्षा बालगोपाल, अरविंद वाडकर, उज्ज्वला केळकर, शरद काणेकर, चिंतामणी कुलकर्णी या साहित्यिकांची उपस्थिती होती.
विधाटे परिवार आणि निकटवर्तीय यांनी संयोजनात सहकार्य केले. दत्तात्रय भोजने यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली कांबळे यांनी आभार मानले.