“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २४ वा”
तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
जात वित्त गोत कुळ शील मात।
भजकां त्वरित भावना युक्त।।
उपासनेचे जे अनेक मार्ग आहेत त्यांत भजन म्हणजे “नामस्मरण” हेच सर्वांत श्रेष्ठ व सुलभ असल्यामुळे संतांनी जगाला याच मार्गाचा उपदेश केला आहे. *तुका म्हणे येथे भजनचि प्रमाण।*
या शब्दांत तुकाराम महाराजांनी भजन हेच आम्हांला प्रमाण आहे, बाकी सर्व आमच्या दृष्टीने व्यर्थ आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ….
तू सुद्धां भजनाचा (नामस्मरणाचा) मार्ग धर, शुद्ध भावाने युक्त होऊन त्वरित म्हणजे विलंब न करता, यापुढे तरी आपले आयुष्य, भजन-नामस्मरणाच्या मार्गाला लाव. *आतां तरी पुढे हाचि उपदेश।* *नका करू नाश आयुष्याचा।।*
हा मार्ग इतका गोड आहे की, तो तुझी जात पहात नाही, तुझ्याजवळ किती वित्त आहे याची विचारपूस करीत नाही, तुझे गोत्र काय याची चिंता करीत नाही, तुझे कुळ व शील उच्च की नीच यासंबंधी पर्वा करीत नाही. तू जसा असशील तेथून तुला वर काढायचा, तुझा उद्धार करायचा, तुला बंधमुक्त करायचा व तुला अन्तर्बाह्य सुखी करायचे, हेच या ”नाम” देवतेचे ब्रीद आहे.
म्हणून आपल्या जाती-पातीचा, कुळ-शीलाचा, वित्त-गोत्राचा किंचितही विचार न करता, चिंता न करता तू वर सांगितलेल्या शुद्ध भावाने युक्त होऊन भजनमार्गाचा त्वरित अवलंब कर.
✅सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी संतांनी खोल विचार करून उत्कृष्ट असा मार्ग शोधून काढला. सर्व पूर्व पापांचे भस्म करणारे, अगणित पुण्याची कमाई करून देणारे, कष्ट रहित व खर्च रहित, चारी वर्णाच्या लोकांना व स्त्रियांना सहज घेण्यास सोपे असे सुंदर सारभूत साधन म्हणजे भगवन्नाम संतांनी शोधून काढले व सर्व जनतेला उदार अंत:करणाने बहाल केले. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।
अशी गर्जना योगियांचे मेरूमणी, ज्ञानियांचे शिरोमणी व भक्तांचे मुगुटमणी अशा थोर पूज्यपाद ज्ञानेश्वर महाराजांनी केली.
तर तुकाराम महाराजांनी हांकारून सांगितले,
अलभ्य ते लाभ होतील अपार।
नाम निरंतर म्हणतां वाचे।।
नामस्मरण हा सर्व सत्कर्माचा राजा आहे. असे हे नामस्मरण करणे म्हणजे अक्षरश: अगणित पुण्याईची कमाई करणे होय. असे हे नामस्मरण करण्यास कुठल्याही उपकरणांची किंवा उपचारांची गरज नाही.
दिसायला छोटे व फळ देण्यास मोठे, अत्यंत उत्कृष्ट व उपाधी रहित असे हे “पुण्यप्रद साधन” आहे. आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या हरिनामांत आहे.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1079
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन
- संक्रातीच्या निमित्ताने प्रशांत भागवत मित्र परिवाराच्या वतीने तिळगुळाचे वाटप