जे जे भेटे भूत -ते ते जाणिजे भगवंत!
मित्रांनो,
सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलीने जगातील प्रत्येक प्राण्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघावं हे वरील प्रमाणे स्पष्ट सांगून ठेवलेल आहे! चला तर मग त्याच दृष्टिकोनातून आपली जीवनशैली प्रत्यक्ष जगूया!
आनंदाचे डोही आनंद तरंग याची- अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही! कशी ती आपण पाहूया! मित्रांनो– सर्वप्रथम आपण निश्चितच भाग्यवान आहोत कारण की– आपल्या व्यक्तिमत्त्वात निश्चितच काहीतरी विशेष आहे! आणि समोरच्याला त्याचाच राग वाटण- हेवा वाटण मत्सर- वाटणं हे साहजिकच आहे!
कारण आपल्यात वसत असलेल्या त्या सद्गुणांच्या कारणाने कळत- नकळत समोरच्या माणसाच्या अहंकाराला आपल्याकडून डंख मारला जातो! त्यामुळे थोडक्यात त्याचा अहंभाव दुखावला जातो! म्हणून त्याला आपण सामोर कसं जावं हे आज आपल्याला ठरवायचं आहे! सर्वसाधारणपणे आपण ॲक्शन इज इक्वल टू रिअक्शन म्हणजेच जशास तसे या नियमाप्रमाणे त्याचा राग राग करू शकतो!
त्याच्या विषयी आपल्या मनात तशीच असूया- मत्सर निर्माण होते हे आपल्याकडून होणे अगदी साहजिकच आहे! पण – त्यापेक्षा आपल्याला वेगळ्या प्रकारे ते स्वीकारायचं आहे! त्याला प्रतिसाद द्यायचा आहे आणि हाच आपला आजचा महत्त्वाचा चिंतनाचा विषय आहे!मित्रांनो– सर्वप्रथम आपण आपला इगो बाजूला ठेवू या!
आपला स्वाभिमान थोडा वेळ बाजूला ठेवून एक लहान मुलाचा अत्यंत निष्पाप निरागस असा विचार मनात रुजवू या! याचा परिणाम असा होईल की आपल्या मनाचा गाभारा हा अथांग प्रेमाने काठोकाठ भरेल! त्यामुळे जी जी व्यक्ती आपला हेवा करते- आपला द्वेष करते- तिरस्कार करते आपल्याविषयी जिच्या मनात असूया निर्माण झालेली आहे तिच्याविषयी आपल्याला कधीच द्वेष वाटणार नाही!
उलट आपल्या प्रत्येक कृतीतून प्रेम माया ममता याचं स्त्रोत्र निर्माण होईल आणि त्याचा प्रवाह त्याच्या हृदयापर्यंत निश्चितच जाऊन भिडेल! आणि इथेच एक अतीव आनंदाची अनुभूती आपण अनुभवणार आहोत! अर्थात हे वाटतं इतकं सोपं नाही पण एवढं कठीण पण निश्चित नाही! त्यामुळे यापुढील आयुष्यात कोणीही तुमचा सहजासहजी अपमान करू शकणार नाही! तुम्ही आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवणार आहात!
कारण राग लोभ मत्सर याच्या पलीकडे तुमचा प्रवास सुरु झालेला आहे!तुम्हाला एक दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे! तुम्ही ईश्वराच्या अत्यंत जवळ गेलेले आहात! तुमच्या अस्तित्वाची- स्वतःची तुम्हाला निश्चितपणे जाणीव झालेली आहे! आणि ती तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणार आहे! मित्रांनो हा मार्ग खरोखरच जरी कठीण असला तरी तो निश्चितपणे आनंददायी आहे!
आपण हा मार्ग मनापासून स्वीकारल्यास निश्चितच आजच्या आपल्या चिंतनाच फलित होईल असं मला वाटतं प्रयोग तर करून बघा याला हरकत काय आहे? आणि हो मित्रांनो नेहमीप्रमाणे मी आपल्याबरोबरच आहे! मी ही अशी अनुभूती काहीवेळा बर्यापैकी अनुभवली आहे! म्हणूनच हा विषय आपल्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आज इथेच थांबतो! पुन्हा भेटूया उद्या नवीन विषयाच्या आधाराने तोपर्यंत धन्यवाद!
( शब्दांकन- ला.डॉ. शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन
- संक्रातीच्या निमित्ताने प्रशांत भागवत मित्र परिवाराच्या वतीने तिळगुळाचे वाटप